Kartiki Gaikwad Shared a Video : कार्तिकी गायकवाड मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका आहे. तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची ती विजेती ठरली होती. या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने ती प्रसिद्धीझोतात आली. गायनासह कार्तिकी सोशल मीडियावरही सक्रिय असते. यामार्फत ती तिच्या गायनाच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ पोस्ट करत असते. अशातच कार्तिकीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओने प्रेक्षकांसह कलाकारांचंही लक्ष वेधलं आहे.
कार्तिकीने तिचा सांगीतिक मैफिलीतला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती गाणं गाताना दिसत आहे, तर यावेळी तिच्यासह तिचा मुलगा रिशांक तिच्या मांडीवर बसलेला पाहायला मिळतोय. आई गाणं गात असताना तो शांतपणे ते ऐकत असल्याचं दिसतं. कार्तिकीने या व्हिडीओला “रिशांकसोबतची कार्यक्रमाच्या तालमीच्या वेळेची एक गोड आठवण” असं खास कॅप्शन दिलं आहे.
कार्तिकीने शेअर केलेल्या या गोड व्हिडीओखाली तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत कौतुक केलं आहे. या व्हिडीओखाली गायिका मुग्धा वैशंपायनने “अगं कसा गोड बघतोय तो”, असं म्हटलं आहे तर प्रथमेश लघाटेनेही “क्लास” असं म्हणत कमेंट केली आहे. अभिनेत्री मेघना एरंडेनेही कमेंट करत कार्तिकीच्या बाळाचं कौतुक केलं आहे. यासह एका नेटकऱ्याने “तो बोलत असेल माझी आई किती गोड गाते”, तर दुसऱ्याने “किती गोड दिसतोय आणि शांत बसला आहे”, असं म्हटलं आहे.
कार्तिकीने १४ मे २०२४ रोजी तिला मुलगा झाल्याची गुड न्यूज सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. यापूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच तिने मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. कार्तिकीने रोनित पिसेसह डिसेंबर २०२० रोजी लग्न केलं होतं. अशातच गायिकेच्या भावाचंही नुकतंच लग्न झालं आहे. यावेळी तिने तिच्या भावाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
कार्तिकी सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे एक लाखाहून अधिक फॉलॉअर्स आहते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामध्ये स्पर्धक म्हणून तिने भाग घेतला होता; तर ती या कार्यक्रमाची विजेतीही ठरली होती. या कार्यक्रमामुळे ती महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.
दरम्यान, कार्तिकीने अनेक भक्तिगीतं, मालिकेची शीर्षक गीतं गायली आहेत. ‘जय जय विठ्ठल रखुमाई’, ‘ओम साई राम’, ‘खोड्या नको करू रे’, ‘जिंदगी का सफर’, ‘कसे वेड लाविले’, ‘शिवरायांना मुजरा’, ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत; तर ती गायनाचे अनेक लाईव्ह कार्यक्रमही करत असते.