सारेगमप लिटील चॅम्प्सचं नवं सिझन नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या सिझनमध्ये गायनाच्या क्षेत्रात इतिहास घडवणारे पंचरत्न परिक्षकाच्या खुर्चीवर बसून आता नव्या स्पर्धकांचं मार्गदर्शन करत आहेत. लिटील चॅम्पच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड देखील परिक्षक म्हणून या कार्यक्रमात झळकतेयं. घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे.

कार्तिकीला ‘सारेगमपच्या मंचांमुळे तुझ्यात काय बदल झाला?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने उत्तर देत, ‘या मंचामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. अतिशय कमी वयात आमच्यातील कला तमाम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं आणि इतकंच नव्हे तर अनेक दिग्गज मान्यवरांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले’ असे म्हटले.

पुढे ती म्हणाली, ‘या पर्वातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे आणि त्याचसोबत मी या मंचाकडून खूप काही शिकले. या कार्यक्रमाची विजेती होण्याचा बहुमान मला मिळाला आणि त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं. हे पर्व माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण पान आहे आणि या मंचामुळे माझं संगीत आणि जीवनमान उंचावलं तसंच मला एक ओळख मिळाली.’