प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावर बॉलिवूडसह अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (केआरके) यानेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने आर्यन खानला कशी अटक झाली? आणि या केसचे पुढे काय होणार? याबद्दल भविष्यवाणी केली आहे.
बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर त्याचे मत मांडताना दिसतो. गेल्या अनेक दिवसांपासून केआरके बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. नुकतंच त्याने शाहरुखचा मुलगा आर्यन खानबद्दल विशेष टिप्पणी केली आहे.
आर्यन खान माफी मागेल आणि केस बंद होईल, केआरकेची भविष्यवाणी
केआरकेने जाहीर केलेल्या व्हिडीओनुसार, “एनसीबीने आर्यन खान व्यतिरिक्त ७ जणांना अटक केली आहे. यात अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सारिका आणि विक्रांत छोकर यांचा समावेश आहे. एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत औषधांचे सेवन, विक्री आणि खरेदी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. आर्यन खान हा या क्रूझ पार्टीसाठीचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. मात्र कोणालाही ब्रँड अॅम्बेसेडर असंच बनवलं जात नाही. त्यापूर्वी त्याची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार आर्यन खानची परवानगी विचारण्यात आली असेल. त्यानंतर त्याने शाहरुख खानला याबाबत विचारणा केली असता त्यानेही सहज परवानगी दिली असेल. यानंतर जेव्हा या पार्टीच्या तिकीटांची विक्री सुरु झाली, तेव्हा एनसीबीने छापेमारी करण्याची आणि आर्यनला अटक करण्याची योजना आखली होती,” असे केआरकेने सांगितले.
“एनसीबीला कोण ड्रग्ज घेतंय? याची माहिती आधीपासूनच होती. त्यानंतरच एनसीबीने आर्यनला अटक केली. पण या केसच पुढे काहीही होणार नाही. कारण जर तुम्हाला माहिती असेल तर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता फरदीन खानलाही अटक करण्यात आली होती. काही दिवस त्याला जेलमध्येही राहावं लागलं होतं. मात्र काही महिन्यांनी फरदीनने यापुढे पुन्हा कधीही असं करणार नाही, असे सांगत न्यायालयात माफी मागितली. फरदीनने माफी मागितली आणि ही केस बंद झाली. त्यानंतर सर्वांची मुक्तता करण्यात आली. त्यानुसारच जेव्हा आर्यन खानची केस कोर्टात जाईल, तेव्हाही अशाचप्रकारे आर्यन खान माफी मागेल आणि ही केस बंद होईल, अशी भविष्यवाणी केआरकेने केली आहे.
७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत आहे. आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसोबतच मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना देखील ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पाहा व्हिडीओ :