झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा म्हणजेच परी ही चिमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेत समीरची भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने श्रेयस तळपदेसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. श्रेयस तळपदेचा नुकताच त्याचा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्याने ही पोस्ट लिहिली आहे.
श्रेयस तळपदेने काल त्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त संकर्षण कऱ्हाडेने एक खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहिताना संकर्षणने श्रेयसचे कौतुक केले आहे. त्यासोबतच त्याला वाढदिवसाच्या हटके पद्धतीने शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
संकर्षण कऱ्हाडेची इन्स्टाग्राम पोस्ट
“… तू खरंच खूप चांगला आहेस.. माझं तुझ्यावर खरंच खूप मनापासून निस्वार्थी प्रेम आहे.. माझ्या मनात तुझ्याविषयी नितांत आदर आहे ..” आणि हे सगळं तू तूझ्या वागण्यातूनच मला वाटायला भाग पाडलं आहेस..”
“आजवर एक अनुभवी , यशस्वी अभिनेता म्हणून तू माझ्यावर कधीही, एकदाही, वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्नं केला नाहीस.. तु तुझ्या असण्याचं, वलयाचं माझ्यावर कधीही दडपण आणलं नाहीस.. माझं कौतुकच केलंस आणि मुख्य म्हणजे माझ्या माघारी लोकांनी केलेलं माझं कौतुक मला येउन सांगितलंस. तुझं मन खरंच खूप मोठं आहे.”
“स्वत:च्या कामाविषयी आत्मविश्वास असलेले लोक ईतरांची निंदा करण्यात वेळ घालवत नाहीत असं म्हणतात..तसा तू आहेस. तुझ्यासोबतच्या ह्या ७ महिन्यांच्या काळात मी तुला कुणाची निंदा करतांना ऐकलं नाही. म्हणूनच… माझ्या आयुष्यात आजवर जे जे जेष्ठं किंवा अनुभवी कलाकार आले ज्यांनी मला प्रेमानेच वागवलं आणि माझ्या मनांत आयुष्यभराची आदराची जागा मिळवली त्यांच्या पंक्तीत तू आहेस आणि कायम राहाशील.”
“शिवाय समीर म्हणून मी काम केल्याने माझ्या लोकप्रियतेत, लोकांच्या माझ्यावरच्या प्रेमात जी भर पडलीये आणि त्यामुळे मला जे जे काही म्हणून मिळतंय त्याचं सगळं श्रेय श्रेयस दादाचंच आहे. निर्वीवाद… दादा तुला शुभेच्छा अशा देतो कि, तुला हवं ते सगळं मिळू दे… तुझ्या इथून पुढच्या सगळ्या कलाकृतींना घवघवीत यश मिळू दे.. तुझ्या कलाकृतींना भाषेचं बंधन नं राहता तू सगळ्या जगात लोकप्रियता मिळव…”
“एक नवरा म्हणून सुख , बाप म्हणुन अभिमान , कलाकार म्हणून यश , आणि माणुस म्हणून समाधान तुला आयुष्यंभर मिळत राहावं हीच देवाला प्रार्थना”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान संकर्षणने लिहिलेली ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर श्रेयस तळपदेनेही कमेंट केली आहे. त्याने लव्हू यू ब्रदर अशी कमेंट केली आहे. त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.