‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होत आहेत. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटातील एक खूप गाजत असलेलं गाणं मराठी सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने लिहिलं आहे.

या चित्रपटातील ‘मंगळागौर’ या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या गाण्याने यूट्यूबवर १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत. या गाण्यामध्ये सर्व अभिनेत्री मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसत आहेत. या गाण्याचे शब्द अभिनेत्री अदिती द्रविडने लिहिले आहेत. तर या गाण्याला साई-पियुष यांनी संगीतबद्ध केलं असून सावनी रवींद्रने हे गाणं गायलं आहे. अदिती आतापर्यंत अनेक मालिका-चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर या चित्रपटाच्या निमित्ताने तिचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून अदितीने इन्स्टाग्रामवर या गाण्याची लिंक शेअर करत लिहिलं, “मी लिहिलेलं गाणं.. ऐकलं किंवा पाहिलं नसेल तर नक्की पाहा. या गाण्याने यूट्यूबवर १ मिलियन व्ह्यूज पूर्ण केलेच आहेत आणि त्याबरोबरच हे गाणं अजूनही यूट्यूबवर ट्रेंड करत आहे.”

आणखी वाचा : “बाल्कनीतलं ब्लॅकचं तिकिट काढून…,” केदार शिंदेंनी वंदना गुप्तेंबद्दल केलेल्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

अदिती गेली अनेक वर्षं गीतलेखन करत आहे, तर ‘मंगळागौर’ गाण्याबद्दल ‘लोकसत्ता’शी बोलताना ती म्हणाली, “या गाण्याचे संगीत दिग्दर्शक साई-पियुष यांनी मला जेव्हा या गाण्यासाठी विचारलं तेव्हाच मी खूप उत्सुक होते. या चित्रपटाची कथा काय आणि कशी असेल, हे गाणं चित्रपटात कुठे असेल याबद्दल मला आधीच माहीत होतं. या चित्रपटाची कथा ऐकल्यावर आणि दिग्दर्शन कसं असेल हे कळल्यावर मी भारावून गेले आणि त्यामुळे हे गाणं लिहिणं मी खूप एन्जॉय केलं. या गाण्यात मंगळागौरीची पारंपरिक गाणी, ओव्या आहेत, तर काही मी नव्याने लिहिल्या आहेत. मला पारंपरिक ओव्या माहीत असल्याने आपण कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे याचा मला अंदाज होता. त्या पारंपरिक ओव्यांच्या चालींना कुठेही धक्का न लावता त्या नवीन पद्धतीने साई-पियुषने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. हे गाणं चित्रपटाच्या अगदी शेवटी आहे आणि प्रेक्षक हे गाणं संपेपर्यंत चित्रपटगृहात बसून असतात. प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसादच माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे.”

View this post on Instagram

A post shared by Aditi Vinayak Dravid (@aditi_vinayak_dravid)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पहिल्या वीकएण्डला ६.४५ कोटींची कमाई करत ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पहिल्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारा यावर्षीचा मराठी चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.