Alka Kubal Shares Thought on Film Industry: मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अशी अलका कुबल यांची ओळख आहे. त्यांनी ‘माहेरची साडी’, ‘आई माझी काळुबाई’, अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.
अलका कुबल गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. २७ वर्षांनंतर त्या रंगभूमीवर परतल्या आहेत. ‘वजनदार’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. त्यांचं नाटक पाहिल्यानंतर अनेक चाहते तसेच कलाकार त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. आता मात्र अलका कुबल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.
अलका कुबल यांच्या मुली कोणत्या क्षेत्रात काम करतात?
अलका कुबल यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांच्या मुली अभिनय क्षेत्रात का नाहीत? यावर त्यांनी वक्तव्य केले. अलका कुबल म्हणाल्या, “मी पडद्यावर रडले तरी मुळात खंबीर आहे. माझी मुलगी पायलट आहे. जावई पायलट आहे. दुसरी अॅनेस्थेसिया (Anesthesia) मध्ये एमडी करत आहे; तर दोघी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी त्यांच्या आवडीने क्षेत्र निवडली आहेत. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी माझा कधी विरोध नव्हता आणि खूप पाठिंबादेखील नव्हता.”
पुढे अलका कुबल म्हणाल्या की, अभिनयामधील करिअर हे अळवावरचं पाणी आहे. नशिबाचा भाग खूप आहे. एखादी कलाकृती खूप चालली, तर पुढे संधी मिळते; नाहीतर शेवटपर्यंत संघर्ष करावा लागतो. पैसाही त्या मानाने मिळत नाही आणि नावही मिळत नाही. फक्त लोक ओळखतात, आताच्या काळात खूप स्पर्धा आहे.
अलका कुबल यांच्या कामाबाबत बोलायचे तर वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘चक्र’ या हिंदी सिनेमात काम केले होते. या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील प्रमुख भूमिकेत होत्या. ‘स्त्रीधन’, ‘लेक चालली सासरला’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘शुभ बोल नाऱ्या’ चित्रपटांतून त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचे मराठी सिनेमे खूप गाजले. त्यांनी मालिकेतदेखील काम केले आहे.
आता त्या ‘वजनदार’ नाटकामुळे चर्चेत आल्या आहेत. या नाटकात त्यांच्याबरोबर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता अभिषेक देशमुखदेखील काम करत आहे. सुकन्या मोने यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नाटकाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते. आता प्रेक्षक त्यांच्या या नवीन कलाकृतीला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.