Ankur Wadhave Anniversary : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमामुळे अनेक कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे असे अनेक कलाकार या कार्यक्रमामुळे चर्चेत आले. याच शोमुळे अभिनेता अंकुर वाढवे देखील प्रसिद्धीझोतात आला.
अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर अंकुरने गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अभिनेत्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने अभिनेत्याने पत्नीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
अंकुर वाढवे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. २८ जून २०१९ रोजी अंकुरचा विवाह पार पडला होता. आज अभिनेत्याच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्याने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह त्याने पत्नीबरोबर सुंदर फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अंकुर वाढवे पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहितो, “सहा वर्षांपूर्वी कायद्याने आपण नवरा बायको झालो तो हाच दिवस होता आज तो “हम्म!” पर्यंत येऊन पोहोचला. प्रवास पुढे कुठे जाईल माहीत नाही पण सध्या तरी सुखात, आनंदात, सुरू आहे आणि असाच राहील लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको”

दरम्यान, अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही दिवसांपूर्वीच अंकुरने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एक कौतुकास्पद निर्णय घेतला होता. त्याने अवयवदान आणि देहदानाचा निर्णय घेतल्याची माहिती सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली होती.