Jarann Marathi Movie Box Office Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अमृता सुभाषची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जारण’ सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. ‘जारण’च्या निमित्ताने प्रेक्षकांना सिनेमागृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. या सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरच सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. बहुचर्चित ‘जारण’ सिनेमा ६ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने गेल्या १० दिवसांत किती कमाई केली? जाणून घेऊयात…
बॉलीवूडला ‘भुल भुलैय्या’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी हे ‘जारण’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं असून, अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
‘जारण’ सिनेमाची कमाई…
मे ( २०२५ ) महिन्यापासून मराठी सिनेमाला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘आता थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ या सिनेमांपाठोपाठ अमृता सुभाषच्या ‘जारण’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार ६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘जारण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गेल्या दहा दिवसांत एकूण ३.५९ कोटी कमावले आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांत या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “जारण’ ही एका कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यांसारख्या अंधश्रद्धा आणि त्यांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केलं आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल, असा हा चित्रपट आहे.”
दरम्यान, ‘जारण’मध्ये अमृता सुभाषसह अनिता दाते, किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
तर, अमृता सुभाष या चित्रपटाबद्दल म्हणते, “मला नेहमी असं वाटतं की, कलाकाराने एका विशिष्ट प्रकारच्या भूमिकेपुरतं मर्यादित राहू नये. मला नेहमीच प्रयोगशील राहायला आवडतं. माझ्या इतर भूमिकांच्या तुलनेत अशी भूमिका मी आजवर कधीच साकारली नव्हती. ही भूमिका माझ्यासाठी तशी आव्हानात्मक होती. परंतु, दिग्दर्शक आणि माझ्या सहकलाकारांच्या साहाय्याने माझं हे काम सोपं झालं.”