Kshitee Jog Share Emotional Post : मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारी अभिनेत्री म्हणजे क्षिती जोग. आपल्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. अभिनेत्री असण्याबरोबरच क्षिती एक निर्मातीही आहे. क्षिती जोगला अभिनयाचा वारसा लाभला आहे.

क्षिती जोग ही अभिनेते अनंत जोग आणि उज्वला जोग यांची मुलगी आहे. त्याचबरोबर क्षिती दिवंगत अभिनेत्री शांता जोग यांची नातसुद्धा आहे. शांता जोग या मराठीतील दिग्गज अभिनेत्री होत्या. ‘भाऊबंदकी’, ‘श्री’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, अशा नाटकांमधून शांता जोग यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे.

शांता जोग यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची नात म्हणजेच क्षिती जोगने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. क्षितीने इन्स्टाग्रामवर आजी शांता जोग यांचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह क्षिती असं म्हणते, “शांता आज्जी… आपण कधी भेटलो नाही, मी तुला काम करताना पाहिलं नाही… हे माझं दुर्दैव…”

क्षिती जोग इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे तिने म्हटलं, “तुझ्या कामाचं कौतुक आणि तुझी प्रतिभा सगळ्यांकडून ऐकत आले. ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावली’, ‘सुर्याची पिल्ले’, ‘मंतरलेली चैत्रवेल’ आणि बरीच… ही सारी तू अजरामर केलेली नाटकं. मराठी रंगभूमीवरचं तुझं योगदान आम्हाला ठेंगणं करणारं आहे. तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करते आहे. तुझे आशीर्वाद सतत सोबत असूदेत! तुझ्या हिमालयाची सावली अशीच असूदे!”

यापुढे क्षिती म्हणते, “आज अभिमानाने ‘शांताबाईंची नात’ म्हणून मिरवते आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे हेसुद्धा ठाऊक आहे. तू आज असतीस, तर खूप काही शिकता आलं असतं; बोलता आलं असतं. आज तू १०० वर्षांची असतीस आज्जी! जिथे कुठे असशील तिथे खूप खुश रहा. हे तुझं जन्म शताब्दी वर्ष! तुझा वसा मी विसरणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शांता जोग यांचं अपघाती निधन झालं होतं. ‘मंतरलेली चैत्रवेल’ नाटकाच्या दौऱ्यादरम्यान, ५ एप्रिल १९८० रोजी त्यांच्या बसला अपघात झाला. या अपघतात शांता जोग व जयराम हर्डिकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, क्षितीने आजीसाठी शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेक कलाकार व चाहत्यांनी शांता जोग यांना आदरांजली वाहिली आहे.