Mahesh Manjrekar Movie Punha Shivaji Raje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट एलएलपी या चित्रपट निर्मिती कंपनीने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह चित्रपटांच्या अन्य निर्मात्यांविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, चित्रपटाशी संबंधित स्वामित्त्व हक्काचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात…

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेट एलएलपी आणि महेश मांजरेकर यांनी संयुक्तपणे मेसर्स अश्वमी फिल्म्सच्या बॅनरखाली केली होती. मात्र, २०१३ मध्ये मांजरेकरांनी त्यांचे ४० टक्के हक्क हे संपूर्णतः एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटला हस्तांतरित केले. त्यामुळे ही निर्मिती कंपनी चित्रपटाशी संबंधित सर्व बौद्धिक संपदा हक्कांची एकमेव मालक बनली. त्यात प्रीक्वेल, सिक्वेल किंवा इतर मूळ विषयाशी संबंधित कलाकृती तयार करण्याच्या विशेष आणि एकाधिकार हक्कांचा समावेश आहे, असा दावा कंपनीने याचिकेत केला आहे.

या प्रकरणावर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आता येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणारा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा कोणत्याही चित्रपटाचा दुसरा भाग किंवा सिक्वेल नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

महेश मांजरेकर यांनी दिलं स्पष्टीकरण

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिक्वेल, प्रीक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा सिनेमा पूर्णपणे स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या मनातून, आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे.

आम्ही हे सर्व आमच्या प्रसिद्धी उपक्रमांमधून, माध्यमांमधून आणि संवादांमधून स्पष्टपणे सांगितले आहे. मराठी प्रेक्षक हे सुजाण, जाणकार आणि संवेदनशील आहेत. इतिहासाविषयी त्यांचं प्रेम आणि अभिमान आम्हालाही प्रेरणा देतो. त्यामुळे प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा किंवा चुकीचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून कधीच झालेला नाही आणि होणारही नाही.

या चित्रपटाच्या कथेत आम्ही एका गहिऱ्या भावनेला आकार दिला आहे — छत्रपती शिवाजी महाराज १६८० नंतर पुन्हा एकदा या पवित्र महाराष्ट्रभूमीवर अवतरतात. ही केवळ कल्पना नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अंतःकरणात पेटलेली एक ज्वाला आहे — ‘राजे पुन्हा येतील, आपल्या मातीचा सन्मान पुन्हा प्रस्थापित करतील!’

याच भावना, या संकल्पनेतूनच आमच्या चित्रपटाला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हे नाव मिळाले आहे. अलीकडे एका निर्मिती संस्थेने असा दावा केला आहे की या चित्रपटामुळे त्यांच्या बौद्धिक अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. मात्र, आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार, तथ्यहीन आणि चुकीचे आहेत. आमचं कथानक, पात्रं आणि मांडणी ही सर्वस्वी मौलिक आहे.

आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, ते आमचे प्रेरणास्थान, आमचा अभिमान आणि आमचा श्वास आहेत. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या नेतृत्वाची जाणीव आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचं कर्तव्य आणि सौभाग्य आहे.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामागचा आमचा हेतू एकच आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांचा आदर्श आणि त्यांचा न्यायप्रिय स्वभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे. हा प्रयत्न कोणाच्याही आडकाठीशिवाय, कुठल्याही भीतीशिवाय आणि संपूर्ण प्रामाणिकपणे सुरू राहील.

कारण, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत ते संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत आहेत. आणि त्यांच्या कथा सांगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. असं महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.