अभिनेत्री नेहा शितोळेने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आता नेहा एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता ‘देवमाणूस’ या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.

तेजस देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ ने केली आहे.

लेखिका म्हणून पदार्पण करण्याबद्दल नेहा म्हणाली, “लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक थरारक कथा मांडतो आणि त्याला एक भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री या नात्याने आतापर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळेच ते सर्व लिखाणात उतरवताना आधीच्या अनुभवाची मदत झाली.”

ती पुढे म्हणाली, ”‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देऊसकर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि त्याचबरोबर खूप समृद्ध करणारा ठरला. विशेषतः अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.”

neha shitole
अभिनेत्री नेहा शितोळे

सई ताम्हणकर करणार लावणी

‘देवमाणूस’ चित्रपटासंदर्भात एक महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे. या सिनेमात मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे. ही लावणी एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

“मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे,” असं सई तिच्या लावणीबद्दल म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लव फिल्म्स प्रस्तुत, ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.