Varsha Usgaonker : मराठी सिनेविश्वातील ‘वंडगर्ल’, ‘ड्रीमगर्ल’ म्हणून वर्षा उसगांवकरांना ओळखलं जातं. काही महिन्यांपूर्वी त्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये झळकल्या होत्या. चित्रपट असो किंवा मालिका सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘खट्याळ सून नाठाळ सासू’, ‘तुझ्याविना करमेना’, ‘हमाल दे धमाल’, ‘गंमत जंमत’ अशा बऱ्याच सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे.

वर्षा उसगांवकरचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ मध्ये गोव्यातील कुटुंबातील झाला. त्यांनी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं आहे. आज वयाच्या ५७ व्या वर्षी सुद्ध अभिनेत्री एकदम फिट आहेत. त्यांच्या फिटनेसचं रहस्य त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘फिल्मसिटी’ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “मी प्रचंड फुडी आहे. मला चांगलं जेवण आवडतं… पण, मी नेहमी आपलं घरचं पारंपरिक जेवण जेवते. मला मासे खूप आवडतात, भात आवडतो, पुरणपोळी सुद्धा मी खाते. पण, मी या सगळ्या गोष्टी बेतानेच खाते. त्याच्यात मी कधीच बुडून जात नाही. एखाद्या पार्टीत जरी मी गेले आणि तिथे जरी फास्ट फूड असेल, तरी मी त्या पदार्थांकडे कधीच आकर्षित होत नाही. तेवढ्यापुरत्या त्या गोष्टी टेस्ट करते आणि बाजूला होते. कारण, तुम्ही फक्त खाण्यासाठी जगता या गोष्टीला काहीच अर्थ नाही.”

“कोणत्याही चविष्ट पदार्थाचा उपभोग हा तेवढ्यापुरताच घ्यायचा असतो. घरी बनवलेले मासे मी भरपूर खाते, ते आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. आपलं पोट हे फुग्यासारखं असतं, आपण त्याला जेवढं वाढवू तेवढं ते फुगत जातं. त्यामुळे आवडीचे पदार्थ खाताना कुठे कंट्रोल करायचं, हे आपल्या हातात असतं. त्यामुळे पोट भरून खायचं नाही. आयुर्वेदानुसार पोटात जेवल्यावर थोडी जागा हवी. मी सगळ्यांना एवढंच सांगेन की, जसं तुमचं वय वाढत जातं, तसं तुमचं जेवण कमी झालंच पाहिजे. खाताना स्वत:वर निर्बंध ठेवावे लागतात, या गोष्टी मी पाळते आणि याशिवाय बऱ्याच पदार्थांचा मी त्यागही केलेला आहे.” असं अभिनेत्रीने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वर्षा उसगांवकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत त्यांनी साकारलेली माई भूमिका प्रचंड गाजली होती. काही दिवसांपूर्वीच त्या ‘शिवा’ मालिकेत झळकल्या होत्या.