Sai Tamhankar on favorite co-stars: अभिनेत्री सई ताम्हणकरने फक्त मराठी चित्रपटांतूनच नाही, तर हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम करीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘मिमी’, ‘क्राइम बीट’, ‘गुलकंद’, ‘डब्बा कार्टेल’, ‘ग्राऊंड झिरो’, ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘द सीक्रेट्स ऑफ शिलेदार’, ‘मानवत मर्डर्स’, ‘इंडिया लॉकडाऊन’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट्स’, ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’, ‘धुरळा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘गर्लफ्रेंड’, ‘नो एन्ट्री’, ‘लव्ह सोनिया’, अशा अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे. अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. स्क्रीन शेअर केली आहे.
आता अभिनेत्रीने नुकतीच ‘अमुक तमुक’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिचा आवडता सहकलाकार कोणता, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने एका अभिनेत्याने नाव घेतले. आता सई नेमकी काय म्हणाली आहे, ते जाणून घेऊ…
“तिच्याबरोबर काम करताना…”
सई ताम्हणकर म्हणाली, “मला ललित प्रभाकरबरोबर काम करायला खूप आवडतं. तो काम करताना फक्त स्वत:चा विचार करत नाही. तो इतरांसाठीही तितकीच मेहनत करतो.” तो आवडता सहकलाकार का आहे? हे सांगत अभिनेत्री म्हणाली की, काही लोकांकडे असुरक्षितता नसते. ते खूप सुरक्षित असतात. त्यांना कोणत्याही प्रकारची ईर्षा नसते. त्यांना असं वाटत नाही की, आता हिचं काम चांगलं होईल. हे ललितच्या डोक्यातही येत नाही.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “मला सिद्धार्थ चांदेकरबरोबरही काम करायला आवडतं. तोदेखील तसाच आहे. मला तसे लोक आवडतात, जे प्रोजेक्ट चांगला व्हावा, यासाठी विचार करतात. ते असा विचार करत नाहीत की, माझं काम चांगलं झालं पाहिजे. मला असं वाटतं की, सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही जर एकटे कॅमेरासमोर उभे राहिलात, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मेकअप, केशभूषा, लाईट, कपडेपट यांशिवाय तुम्ही स्वत: एकटे काही करू शकत नाही.”
प्रिया बापटचे नाव घेत सई ताम्हणकर म्हणाली, “मला प्रियाबरोबर काम करायला आवडतं. तिच्याबरोबर काम करताना मजा येते. तिची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, माझी आहे. त्यामुळे एक नवीन स्टाईल शोधता येते.”
मुक्ता बर्वेबद्दल सई म्हणाली, “मुक्ताबरोबर मी खूप आधी काम केलं आहे; पण मला तिच्याबरोबर पुन्हा काम करायला आवडेल. खूप मजा येईल.”
पुढे अभिनेत्री असेही म्हणाली की, मला नम्रता संभेरावबरोबर काम करायला खूप आवडेल. मला ती खूप आवडते. समोरच्या कलाकारांचा अभिनय पाहून तुमची दमछाक झाली पाहिजे. अशा कलाकारांबरोबर काम करायला मला आवडतं. पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, अंजली आनंद या कलाकारांबरोबर पुन्हा काम करायला आवडेल.
दरम्यान, अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
