scorecardresearch

Oscars 2017 : जाणून घ्या, ‘लायन’मधील या बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल…

‘लायन’साठी सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार देव पटेलला मिळणार का यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

Oscars 2017 : जाणून घ्या, ‘लायन’मधील या बॉलीवूड अभिनेत्रीबद्दल…
पल्लवी शारदा

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूडच्या दोन सुप्रसिध्द अभिनेत्री हॉलिवूडपटातून भूमिका साकारत आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि ऑस्करसारख्या पुरस्कार सोहळ्यांमधील रेड कार्पेटवरील त्यांची उपस्थिती लक्षवेधी असते. नुकत्याच पार पडलेल्या ८९ व्या ऑस्कर सोहळ्यातील देसी गर्ल प्रियांकाचा ऑस्करच्या रेड कार्पेटवरील जलवा पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रियांकाबरोबरच सनी पवार हा बालकलाकारदेखील सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. ‘लायन’ चित्रपटात त्याने छोट्या सरूची भूमिका साकारली आहे. पल्लवी शारदा नावाच्या बॉलिवूड अभिनेत्रीनेदेखील ‘लायन’ चित्रपटात अभिनय केला आहे. अपार कष्ट करणाऱ्यांसोबत काम करताना मजा येते. त्यांनी घेतलेले कष्ट त्यांच्या निर्मितीतदेखील प्रतित होत असल्याचे मनोगत वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने व्यक्त केलेले. दिग्दर्शक गार्थ डेविस यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक चित्रपट साकारला असून, चित्रपटाला चांगली पसंती मिळत असल्याची भावना ‘लायन’ चित्रपटाविषयी बोलताना तिने व्यक्त केली होती.

pallavi_sharda650
पल्लवीला लहानपणापासूनच नाटक आणि रुपेरी पडद्याचे आकर्षण होते. बाल वयातच तिने भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे धडे गिरविण्यास सुरुवात केली होती. बॉलिवूड अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिलेल्या पल्लवीने ऑस्ट्रेलियातील राहाते घर सोडून मुंबईची वाट धरली. चित्रपट आणि नाटकांमधून भूमिका साकारलेल्या पल्लवीचा ‘बेशरम’ हा बॉलिवूडमधील महत्वाचा चित्रपट ठरला. ‘बेशरम’मध्ये तिला प्रसिध्द अभिनेता रणबीर कपूरसोबत चमकण्याची संधी मिळाली. बॉलिवूडमध्ये फार काही करू न शकलेली पल्लवी ‘लायन’ चित्रपटात देवच्या ‘इंडियन क्लासमेट’च्या भूमिकेत दिसते. या चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्याने पल्लवी पुन्हा एकदा चर्चेत आली.

दरम्यान, देव पटेलला लायन चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी ऑस्करची बाहूली मिळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र देवची जादू ‘मूनलाइट’ चित्रपटातील अभिनेता महेर्शाला अलीसमोर फिकी पडली आणि महेर्शालाने ८९ व्या ऑस्कर पुरस्कारावर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून बाजी मारली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता गटात जेफ ब्रिजेस (हेल ऑर हाय वॉटर), लुकास हेज (मँचेस्टर बाय द सी), देव पटेल (लायन), मिशेल शेनॉन (नोकटर्नल अॅनिमर्ल्स) हे चार स्पर्धक होते. चारही स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत होती. प्रत्येकाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सिनेमातील व्यक्तिरेखा जिवंत केली होती. असे असले तरी ‘मूनलाइट’ चित्रपटातील महेर्शालाने साकारलेली भूमिका काहीशी उजवी ठरली आणि २०१६ मधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्याने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2017 at 15:31 IST

संबंधित बातम्या