बॉलीवूडमध्ये आपल्या दिग्दर्शनाने स्वतःचं वेगळेपण जपणारा आणि बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. अनुराग त्याच्या चित्रपट व सीरिजबरोबरच वक्तव्यामुळेही चर्चेत राहत असतो. अनुराग कश्यपने नेटफ्लिक्सच्या ‘सॅक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेबसीरीजचे सह-दिग्दर्शन केले होते. भारतात वेबसीरिज या नव्या मनोरंजन क्षेत्राचं बीज रुजवण्याचे श्रेय याच सीरिजला जातं. पण आता नेटफ्लिक्सबद्दल अनुरागने नाराजी व्यक्त केली आहे

अनुरागने ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’च्या सीईओवर टीका केली आहे. नेटफ्लिक्सचा सीईओ टेड सारंडोस (Ted Sarandos) यांना त्याने मूर्ख म्हटलं आहे. याचं कारण म्हणजे टेड सारंडोस यांनी अलीकडेच निखिल कामथच्या पॉडकास्टवर हजेरी लावली. यावेळी त्यांनी सांगितले की, जर त्यांना पुन्हा संधी मिळाली असती तर भारतात ओटीटीची सुरुवात त्यांनी ‘सेक्रेड गेम्स’ने केली नसती. त्यांच्या मते आणखी काही लोकप्रिय शो चांगले चालले असते.

टेड सारंडोस यांचं हेच विधान अनुराग कश्यपला आवडलं नसून त्याने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे, “त्यांना ‘सास बहू’ने सुरुवात करायला हवी होती. मग ते ठीक झाले असते आणि आता ते तेच करत आहेत. मला आधीच माहित होते की, हे लोक कथा सांगण्यात मूर्ख असतात. पण आता मला कळले की, टेड सारंडोस स्वतः मूर्खाची परिभाषा आहे.”

अनुराग कश्यपचा त्याच्या पोस्टमधील ‘सास-बहू’चा संदर्भ हा नुकत्याच जाहीर झालेल्या नेटफ्लिक्स इंडिया आणि एकता कपूर यांच्या भागीदारीबद्दलचा असल्याचं म्हटलं जात आहे. एकता कपूरने ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’सारख्या मालिकांनी २००० च्या दशकात टीव्हीवर वर्चस्व गाजवलं होतं. तसेच एकताच्या सास-बहूच्या अनेक मालिका तेव्हा प्रचंड गाजल्या होत्या. तोच ट्रेंड प्रादेशिक भाषेतील मनोरंजन वाहिन्यांनी चालवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटफ्लिक्स इंडियाच्या सध्याच्या कंटेंटबद्दल नाराजी व्यक्त करत अनुराग कश्यपने याआधीही मार्चमधील एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, नेटफ्लिक्स इंडियाची स्थिती सध्या गोंधळलेली, विस्कळीत आणि दर्जाहीन आहे. तेव्हा नेटफ्लिक्सवरील ‘अ‍ॅडोलसन्स’चे (Adolescence) अनुरागने कौतुकही केले होते. अशातच आता त्याने नेटफ्लिक्सच्या सीईओवर मूर्ख म्हणत टीका केली आहे.