सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक असून यामध्ये सारा अली खान प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. २१ मार्चला हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहींनी चित्रपटाचं कौतुक केलं पण बऱ्याच लोकांनी साराच्या अभिनयावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

या चित्रपटातील साराच्या अभिनयावर बऱ्याच लोकांनी टीका केली आहे. बऱ्याच समीक्षकांनीही साराच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. या भूमिकेसाठी लागणारे गांभीर्य साराच्या कामातून दिसत नसल्याची बऱ्याच लोकांनी तक्रार केली. आता साराची आत्या सबा पतौडी हिने साराची बाजू घेत तिच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे. याआधी साराचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला अन् यातही सारा प्रेक्षकांवर छाप पाडण्यात अपयशी ठरली.

आणखी वाचा : उत्कृष्ट अभिनेत्री कोण? करीना कपूर की दीपिका पदूकोण? इम्तियाज अलीने दिलं स्पष्ट उत्तर

करण जोहरने साराच्या ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाचं नुकतंच कौतुक केलं. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर करणने या विषयी पोस्ट केली अन् त्याच्या पोस्टवर बऱ्याच लोकांनी कमेंट्स करत साराच्या अभिनयावर टीका केली. त्यांना साराची आत्या सबा पतौडी यांनी उत्तर दिलं आहे. सबा यांनी आपल्या कमेंटमध्ये लिहिलं, “जोपर्यंत तुम्ही पहिल्यांदा एखादी कलाकृती बघत नाही तोवर तुम्ही त्याबद्दल मत देणं योग्य नाही. सारा ही खरोखर हुशार आहे! माशाअल्लाह.”

फोटो सौजन्य : करण जोहर इंस्टाग्राम पेज

साराच्या या चित्रपटाची कथा दरब फारूकी यांनी लिहिली आहे आणि कन्नन अय्यर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सारा अली खानसह स्पर्श श्रीवास्तव, इमरान हाश्मी, आनंद तिवारी यांच्यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या कथेची, मांडणीची बऱ्याच लोकांनी प्रशंसा केली असली तरी साराच्या कामावर प्रेक्षक मात्र नाराज असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे.