दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट यंदाचा सर्वाधित कमाई करणारा चित्रपट ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

जगभरात ८०० कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला, त्यानंतर हा चित्रपट ११ एप्रिल रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. तो नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. पण बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘छावा’ची ओटीटीवरील सुरुवात फार चांगली नाही.

विकी कौशलचा हा ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या टॉप १० सिनेमांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. ११ एप्रिलला रिलीज झालेला हा चित्रपट या आठवड्यातील टॉप १० यादीत आहे, पण फक्त भारतातच. मात्र जागतिक स्तरावर चित्रपटाची कामगिरी फारशी चांगली नाही. नेटफ्लिक्सने ७ एप्रिल ते १३ एप्रिलपर्यंतचा डेटा शेअर केला आहे. या आकडेवारीनुसार, रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाला २.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५.९ मिलियन तास व्ह्यूज मिळाले आहेत. त्या तुलनेत इब्राहिम अली खानच्या ‘नादानियां’ला ३.९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

नॉन इंग्लिश फिल्म्सच्या कॅटेगरीत मागे आहे ‘छावा’

‘छावा’ला पहिल्या आठवड्यात व्ह्यूज कमी मिळाले आहेत, त्याचबरोबर जागतिक स्तरावर तो चौथ्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर, नॉन इंग्लिश सिनेमांच्या कॅटेगरीत विकी कौशलचा चित्रपट ५.९ मिलियन व्ह्यू अवरसह चौथ्या क्रमांकावर आहे. या तुलनेत साऊथच्या ‘टेस्ट’ चित्रपटाला जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. टेस्ट ६ मिलियन व्ह्यू अवरसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ‘छावा’चा रन टाइम २ तास ३८ मिनिटं आहे. तर, टेस्टचा रन टाइम २ तास २६ मिनिटं आहे. ‘छावा’चा रन टाइम १२ मिनिटं जास्त आहे. त्याचबरोबर या यादीत पहिल्या क्रमांकावर हॉलीवूड चित्रपट ‘द डेड क्वेस्ट’ आहे. याला १२.६ मिलियन व्ह्यू अवर मिळाले आहेत.

vicky kaushal chhaava OTT performance (1)
छावा चित्रपटाचे पोस्टर (फोटो – इन्स्टाग्राम)

रिलीजच्या पहिल्या आठवड्यात कोणत्या सिनेमाला मिळाले किती व्ह्यूज?

२०२५ या वर्षात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या पहिल्या आठवड्यातील व्ह्यूजबद्दल जाणून घेऊयात. या यादीत सर्वात वरती ‘धूम धाम है’ आहे, ज्याला रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ४.१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ‘नादानियां’ ३.९ मिलियन, तिसऱ्या क्रमांकावर ‘देवा’ २.८ मिलियन व्ह्यूज, चौथ्या क्रमांकावर ‘छावा’ २.२ मिलियन, पाचव्या क्रमांकावर ‘इमर्जन्सी’ १.४ मिलियन आणि सहाव्या क्रमांकावर ‘आझाद’ १.१ मिलियन व्ह्यूज आहे.