बॉलीवूडमधील अभिनेते पंकज त्रिपाठी अलीकडेच ‘क्रिमिनल जस्टिस : अ फॅमिली मॅटर’ या चित्रपटात दिसले आहेत. इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेले पंकज त्रिपाठी यांनी गेल्या वर्षी इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता.
या ज्येष्ठ अभिनेत्याने अलीकडेच खुलासा केला की, त्यांनी गेल्या वर्षी एक वर्षाचा ब्रेक घेतला होता आणि एकही चित्रपट साइन केला नव्हता. त्यांनी जाणूनबुजून हा ब्रेक घेतला होता. त्यांनी असेही म्हटले की, त्यांनी सोशल मीडियावर ब्रेकची घोषणा न करता, ते आत्मपरीक्षणाच्या प्रवासाला गेले होते.
हॉलीवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले, “माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी आत्मपरीक्षणाच्या प्रवासाला निघालो. मी एक वर्ष कोणताही चित्रपट साइन केला नाही आणि मी ब्रेक घेत असल्याचे जाहीरही केले नाही. ते पुढे म्हणाले, “मी स्वतःवर काम करण्यासाठी आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या बरे होण्यासाठी वेळ काढला. त्यामुळे माझे वजन कमी झाले आहे. मी आठवड्यातून सहा दिवस तीन तास वर्कआउट करतो. मी अशा ट्रिपवरही गेलो, ज्या मी बऱ्याच काळापासून पुढे ढकलत होतो.” त्यांनी आपले मन आणि शरीर सुधारण्यासाठी हा ब्रेक घेतला. त्यांनी हा निर्णय कोणालाही न सांगता, शांतपणे घेतला आणि स्वतःबरोबर वेळ घालवला.
गेल्या वर्षी पंकज यांनी ‘मेट्रो…इन दिनों’साठी जाहिरातींचे शूटिंग आणि थोडे पॅचवर्क, अशी फक्त काही छोटी छोटी कामे केली होती. ते म्हणतात की, त्यांनी जाणूनबुजून मीडियापासून अंतर ठेवले आणि नवीन स्क्रिप्ट वाचल्या नाहीत. त्याबद्दल पंकज त्रिपाठी म्हणतात, “मी सर्वांना सांगत राहिलो की, माझ्याकडे वेळ नाही. कारण- मी फक्त स्वतःबरोबर वेळ घालवत होतो,”
पंकज म्हणतात, “आता मी पैशासाठी काम करीत नाही. मला असे प्रोजेक्ट हवे आहेत, जे मला मनापासून आवडतील. पूर्वी मी शूटिंग संपण्याची वाट पाहत असे,; पण नंतर मला वाटले- जर मला हा व्यवसाय आवडतो, तर मला असे का वाटत आहे?”
वडिलांना आठवून पंकज यांनी नुकताच मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार त्यांना समर्पित केला. वडिलांच्या निधनानंतर हा अभिनेता खूप दुःखी झाला आणि त्यांनी त्यांच्या गावातील शाळेत एक ग्रंथालयही उघडले. अभिनेत्याने हे ग्रंथालय त्यांच्या वडिलांना समर्पित केले.
आता पंकज त्रिपाठी लवकरच ‘मेट्रो… इन दिनों’मध्ये दिसणार आहेत, जो ४ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ते आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, नीना गुप्ता, अनुपम खेर यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्सबरोबर दिसणार आहेत.