भारतात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. कारण या व्हायरसची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दिल्ली आणि हैदराबाद येथे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. अशातच अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरद्वारे लोकांना करोनावर उपाय सांगितला होता. पण काही वेळातच त्यांनी त्यांचे ट्विट डिलिट केले.

प्रकाश राज यांनी त्याच्या ट्विटमध्ये एक कप गरम पाण्यात लिंबू घालून ते पाणी प्यायल्याने करोनापासून बचाव होऊ शकतो असे ट्विटमध्ये म्हटले होते. पण काही वेळातच त्यांनी त्याचे हे ट्विट डिलिट केले.

ते ट्विट डिलिट केल्यावर प्रकाश यांनी आणखी एक ट्विट केले. ‘एखादे चांगले काम करण्याच्या नादात मी चुकीच्या माहितीचा शिकार झालो. पण चांगली गोष्ट ही आहे की माझी चूक सुधारली आहे. त्यामुळे मी चुकीचे ट्विट डिलिट केले आहे’ असे प्रकाश यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले.

प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘सुधारित नागरिकत्व कायद्या’ (CAA) वरून दिल्लीत सुरु असलेला हिंसाचाराशी संबंधीत ट्विट केले होते. “ज्यांनी या रानटी वृत्तीला मते देऊन सत्तेत बसवले, त्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे… एक समाज म्हणून आपली काय अवस्था झाली आहे!!” अशा आशयाचे ट्विट करुन प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला होता.