कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे गेल्या वर्षी २९ ऑक्टोबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला वर्ष पूर्ण होण्यास काही दिवस शिल्लक असतानाचा पुनीत यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गंधडा गुडी असे या चित्रपटाचे नाव आहे. लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे पुनीतच्या या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट केला आहे.

गंधडा गुडी हा अभिनेता पुनीत राजकुमार याचा ड्रीम प्रोजेक्ट होता. या चित्रपटासाठी ते फारच उत्सुक होते. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले. पुनीत राजकुमार यांचा हा शेवटचा चित्रपट येत्या २८ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुनीत हा जंगलातील जीवनाचा शोध घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. देशाच्या भूमीचा समृद्ध वारसा, संस्कृती, निसर्ग आणि वैविध्य याबद्दल हा चित्रपट भाष्य करताना दिसणार आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी पुनीतने जंगलात दिवस घालवले आहेत. त्याची कथाही फार उत्तम असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी पुनीतने प्रचंड मेहनत घेतली आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.
आणखी वाचा : लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच अभिनेत्री नयनतारा झाली आई, घरी जुळ्या मुलांचे आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिट्वीट केला आहे. याला त्यांनी कॅप्शनही दिले आहे. “अप्पू, जगातील कोट्यावधी लोकांच्या हृदयात तुमचे स्थान आहे. तुम्ही एक उत्कृष्ट अभिनेते आहात. ज्याच्याकडे प्रचंड मोठी उर्जा होती. गंधडा गुढी म्हणजे निसर्गाला दिलेली श्रद्धांजली आहे. कर्नाटकातील सौंदर्य आणि वातावरणाची भाषा आहे. या प्रयत्नांबद्दल अभिनंदन”, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

यापूर्वी पुनीत राजकुमारची पत्नी अश्विनी राजकुमार यांनी हा ट्रेलर शेअर करताना पंतप्रधान मोदींना टॅग केले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या, “आजचा दिवस आमच्यासाठी फारच भावनिक आहे कारण आम्ही गंधडा गुडी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करत आहोत, जो अप्पूच्या हृदयाच्या खूप जवळ आहे. अप्पूने नेहमीच तुमच्याशी संभाषण केले आहे आणि ते तुमच्याशी वैयक्तिकरित्या शेअर करायला आवडेल.”

आणखी वाचा : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन, ४६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान गंधडा गुडी या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोघवर्ष यांनी केले आहे. तर पुनीत राजकुमारची पत्नी अश्विनी राजकुमार यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट कन्नड, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २८ ऑक्टोबर २०२२ ला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.