रिअॅलिटी शोच्या गर्दीत असे काही कार्यक्रम आहेत ज्यांच्या लोकप्रियतेला कधीही धक्का लागत नाही. कितीही कार्यक्रमांनी टेलिव्हिजन विश्वात धुमाकूळ घातला तरीही प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कार्यक्रमांना कधीही मरण नसते. असाच एक रिअॅलिटी शो म्हणजे ‘सा रे ग म लिटील चॅम्प्स’. या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. अशाच उदंड प्रतिसादात लिटील चॅम्प्सचे हे पर्वही पार पडले. या पर्वाने लोकप्रियतेच्या सर्व सीमा पार केल्या. लिटील चॅम्प्सचे हे पर्व मराठी भाषिकांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठीही तितकेच खास ठरले, कारण नगरच्या अंजली गायकवाडने या कार्यक्रमाच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

पश्चिम बंगालच्या श्रेयान भट्टाचार्य आणि महाराष्ट्रातील नगरच्या अंजली गायकवाड यांना या कार्यक्रमाचे जेतेपद विभागून देण्यात आले. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने दुहेरी आनंद ठरला असे म्हणायला हरकत नाही. याविषयीच लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधताना अंजलीने तिचा आनंद व्यक्त केला. याआधीही अंजलीने तिच्या बहिणीच्या साथीने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात बाजी मारली होती. आपल्या या यशाविषयी सांगताना अंजली म्हणाली, ‘हे यश माझ्यासाठी अनपेक्षित होते. पण, हे सगळं खरंच घडत आहे हे पाहून मला फार आनंद होतोय. विविध वाहिन्यांना, माध्यमांच्या प्रतिनिधींना आम्ही मुलाखती देतोय, त्यामुळे हा अनुभवही खूपच वेगळा आहे. माझ्या शहरात, नगरमध्येही सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.’

‘लिटील चॅम्प्स’च्या निमित्ताने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना विविध क्षेत्रातील दिग्गजांना भेटण्याची, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली होती. त्याविषयीच सांगताना अंजली म्हणाली, ‘लिटील चॅम्प्समधील सर्व परीक्षक आणि ज्युरींनी आम्हाला फार मदत केली होती. सेटवरही त्यांनी नेहमीच खेळीमेळीचे वातावरण ठेवले. त्यामुळे या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्यासमोर काहीच अडचणी आल्या नाहीत.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही परीक्षकांसोबत स्पर्धकांचे खास नाते तयार होते. अंजलीलाही ज्युरीमध्ये आणि परीक्षकांमध्ये असेच एक नाते गवसले. ज्युरींमधील वैशाली माडे आणि परीक्षकांमधील जावेद अली यांनी अंजलीच्या मनात खास स्थान मिळवले. ‘जावेद अली सर नेहमीच इतरांचा आदर करतात. सेटवर आल्यानंतर प्रत्येकाला अभिवादन करतात, त्यांचा असा वावर मला फार भावला. तर, वैशाली माडेसुद्धा मला नेहमीच प्रेरित करत राहिल्या त्यामुळे त्यांच्याशीही माझे वेगळेच नाते तयार झाले होते,’ असेही अंजली म्हणाली. महाराष्ट्राची मुलगी अंजली आज संपूर्ण देशभरात चर्चेत आली आहे. शास्त्रीय संगीत गायनामध्येच तिला नाव कमवायचे असून, या श्रेत्राचीच करिअर म्हणूनही तिने निवड केली आहे. त्यामुळे भविष्यात एक आघाडीची गायिका म्हणून महत्त्वाकांक्षी अंजली गायकवाडचे नाव कानांवर पडल्यास त्यात नवल वाटण्याचे काहीच कारण नाही.