एकाच तरूणीच्या प्रेमात पडलेल्या दोन मित्रांची गोष्ट काय असू शके ल? ‘मेहरून्निसा’ नावाच्या तरूणीच्या प्रेमात पडलेले दोन मित्र तब्बल २५ वर्ष एकमेकांशी बोललेच नाहीत आणि इतक्या वर्षांनंतर समोरासमोर आल्यानंतर या मित्रांच्या मनात साचलेला एकमेकांबद्दलचा राग जेव्हा बाहेर पडेल तेव्हा काय होईल? हे मित्र म्हणजे जर ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि ‘चिंटू’जी ऋषी कपूर असतील तर ?, या प्रश्नांचे उत्तर सुधीर मिश्रांच्या ‘मेहरून्निसा’ या चित्रपटातून मिळणार आहे. इंडस्ट्रीतील एकेकाळची ही लोकप्रिय जोडगोळी २२ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर एकत्र येत आहे.
१९९१ साली आलेल्या ‘अजूबा’ या शशी कपूर दिग्दर्शित चित्रपटात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी पडद्यावर शेवटची एकत्र दिसली होती. या जोडगोळीचे कितीतरी चित्रपट गाजले होते. पण, ‘अजूबा’नंतर ही जोडी एकत्र दिसली नव्हती. त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा योग सुधीर मिश्रांनी जुळवून आणला आहे. सध्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ऋषी कपूरचीही गाडी चरित्र अभिनेता म्हणून नावारूपाला येते आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र आणण्याची हीच योग्य वेळ आहे. सुधीर मिश्रांच्या ‘मेहरून्निसा’मध्ये २५ वर्ष एकमेकांशी न बोलणारे मित्र जेव्हा इतक्या वर्षांनंतर समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्या भावभावना कशारितीने उफाळून येतात याचे चित्रण असणार आहे, अशी माहिती चित्रपटावर काम करणाऱ्या सूत्रांनी दिली. यात मेहरून्निसाची भूमिका ही मिश्रांची आवडती अभिनेत्री चित्रांगदा करणार आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्रांगदाला या दोन दिग्गजांबरोबर काम करण्याची फारशी संधी मिळणार नाही, असेही या सूत्रांनी सांगितले.
चित्रांगदा तरूण मेहरून्निसाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या तरूणपणीच्या भूमिका जे साकारतील त्या नटांबरोबर तिची जास्तीत जास्त दृश्ये असणार आहेत. पण, खरी जुगलबंदी असणार आहे ती अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्यात. सुधीर मिश्रांच्या या चित्रपटाचे चित्रिकरण सप्टेंबरपासून लखनौमध्ये सुरू होणार आहे.