Saif Ali Khan Reveals Jeh Was Injured During Bandra Home Attack : अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी २०२५ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याबद्दल सैफ आणि पत्नी करीना यांनी अनेक मुलाखतींमधून माहिती दिली आहे. सुदैवाने, कोणत्याही जखमा जीवघेण्या नव्हत्या आणि अभिनेता लवकर बरा झाला.
आता सैफने त्या रात्री काय घडले याचा खुलासा केला आहे. ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या ‘टू मच’ या शोमध्ये तो म्हणाला, “करीना (माझी पत्नी) त्या रात्री बाहेर गेली होती आणि मी मुलांबरोबर (तैमूर व जेह) चित्रपट पाहून परत आलो होतो. आम्ही पहाटे २ वाजता झोपायला गेलो. करीना परत आली तेव्हा आम्ही थोडा वेळ बोललो आणि नंतर पुन्हा झोपी गेलो. मग मदतनीस आत आली आणि म्हणाली, ‘जेह बाबाच्या खोलीत कोणीतरी आहे. त्याच्या हातात चाकू आहे आणि तो म्हणत आहे की त्याला पैसे हवे आहेत.”
सैफ म्हणाला, “मी हे ऐकले आणि लगेच पलंगावरून उठलो. मी जेहच्या खोलीत गेलो, तेथे अंधार होता आणि मला बेडवर एक माणूस चाकू घेऊन उभा असलेला दिसला.” अक्षय कुमारने त्याला विचारले, “तो बाळाकडे चाकू दाखवत होता का?” सैफ म्हणाला, “तो चाकू इतका हलवत होता की, जेह आणि आया दोघेही थोडे जखमी झाले. मी त्याच्यावर झडप घातली. त्याच्याकडे दोन चाकू होते आणि तो सगळीकडे वार करू लागला.
सैफ म्हणाला, “मी माझे प्रशिक्षण आठवण्याचा प्रयत्न केला आणि काही वार रोखले; पण नंतर मला पाठीत जोरदार मार लागला. तोपर्यंत घरातील इतर लोक बाहेर आले होते. आमची मदतनीस गीता मदतीला आली आणि तिने हल्लेखोराला माझ्यापासून वेगळे केले. तिने माझा जीव वाचवला. कारण- तोपर्यंत मी अनेक ठिकाणी जखमी झालो होतो. मग आम्ही त्याला एका खोलीत बंद केले.”
सैफ पुढे म्हणाला, “मी जेवणाच्या खोलीत ठेवलेल्या तलवारी उचलल्या; पण तोपर्यंत मी जखमांनी थकलो होतो. माझ्या मणक्यालाही जखम झाली होती. करीनाने ताबडतोब रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरला. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेला होता.” सैफ अली खान म्हणाला, “तैमूरने मला विचारले, ‘तुम्ही आता मरणार का?’. मी म्हणालो, ‘नाही, मला नाही वाटत मी मरेन; पण मला पाठीत खूप वेदना होत आहेत. मी मरणार नाही, मी ठीक आहे. करीना मुलांना लोलोच्या (करिश्मा कपूर) घरी घेऊन जाणार होती. आम्ही एक रिक्षा थांबवली. मग तैमूर म्हणाला की तो माझ्याबरोबर येईल. त्याला पाहून मला बरं वाटलं.”
सैफ म्हणाला, “मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा कर्मचारी अर्धवट झोपेत होते. मी म्हणालो, ‘स्ट्रेचर मिळेल का?’ तो म्हणाला, ‘व्हीलचेअर?’ मी म्हणालो, ‘नाही, मला स्ट्रेचरची गरज आहे. जेव्हा तो जागा झाला नाही, तेव्हा मी म्हणालो, ‘मी सैफ अली खान आहे आणि ही मेडिकल इमर्जन्सी आहे.’ मग गोंधळ उडाला.”
नंतर जेव्हा सैफला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पहिले, तेव्हा लोकांनी विचारले की, इतक्या दुखापतींनंतर तो कसा चालू शकतो. सैफ म्हणाला, “जेव्हा सगळं संपलं, तेव्हा खूप सल्ले आले. बाहेर कसे जायचे, काय बोलावे. मीडिया खूप उत्सुक होता. घटना खूप वाईट होती; पण मी चालू शकत होतो. मला टाके पडले होते. चालणे वेदनादायक होते; पण शक्य होते म्हणून मला व्हीलचेअरची गरज नव्हती.”