अभिनेत्री संगीता बिजलानी सध्या खूप त्रासात आहे. १८ जुलै रोजी तिच्या पुण्यातील फार्महाऊसमध्ये चोरी झाली. या घटनेत संगीताचे मोठे नुकसान झाले. चोरट्यांनी तिच्या फार्महाऊसवर तोडफोड केली. फार्महाऊसवरील चोरीची सर्व माहिती उघड झाली तोपर्यंत संगीताला नेमके किती नुकसान झाले हे माहीत नव्हते. आता तिच्या फार्महाऊसवरील चोरीची सर्व माहिती उघड झाली आहे.
संगीताने अलीकडेच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक (एसपी) संदीप सिंग गिल यांची भेट घेऊन, चोरीच्या तपासाची स्थिती जाणून घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये अज्ञात व्यक्तींनी तिच्या फार्महाऊसमध्ये घुसून रेफ्रिजरेटर, टीव्ही व फर्निचरसारख्या वस्तूंची तोडफोड केली आणि भिंतींवर अश्लील गोष्टी लिहिलेल्या होत्या.
संगीताच्या फार्महाऊसमध्ये चोरी
माहितीनुसार, चार महिन्यांपासून तिचे फार्महाऊस रिकामे होते. १८ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता संगीता बिजलानी तिच्या बंगल्यात आली तेव्हा तिला चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी मागच्या दाराने घरात प्रवेश केला आणि पहिल्या मजल्यावरून ५०,००० रुपये रोख आणि अंदाजे ७,००० रुपये किमतीचा टीव्ही सेट चोरून नेला. एकूण ५७,००० रुपये चोरीला गेले. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की तक्रार दाखल करणारी व्यक्ती संगीता बिजलानीची वैयक्तिक कर्मचारी आहे. चोरांचा अद्याप कोणताही मागमूस सापडलेला नाही.
पोलिसांना दिलेल्या जबाबात संगीता बिजलानी म्हणाली होती, “माझ्या वडिलांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे मी मार्चपासून फार्महाऊसला भेट देऊ शकले नाही. मी आणि माझे दोन नोकर येथे आलो तेव्हा आम्हाला आढळले की, मेन गेट तुटलेले होते. आत गेल्यावर आम्हाला आढळले की, टीव्ही सेट, रोख रक्कम आणि अनेक मौल्यवान घरगुती वस्तू गायब होत्या. सीसीटीव्ही कॅमेरेदेखील तुटलेले होते. माझ्या खासगी जागेत अशी घटना घडली ही माझ्यासाठी खूप दुःखद बाब आहे.”
आयएएनएसशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मी गेल्या २० वर्षांपासून पवना येथे राहत आहे. ते माझे घर आहे; पण या चोरीला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही अद्याप कोणताही तोडगा सापडलेला नाही. संदीप सिंग गिल यांनी आश्वासन दिले आहे की, पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील आणि गुन्हेगारांना पकडतील. फार्महाऊसमध्ये चोरी आणि तोडफोड करण्यात आली, जी भयानक होती. मी भाग्यवान आहे की, मी त्यावेळी तिथे नव्हते. घराच्या आत, भिंतींवर अश्लील गोष्टी लिहिलेल्या होत्या.”
संगीता पुढे म्हणाली, “अनेक वृद्ध नागरिक आणि कुटुंबे पवनामध्ये राहतात आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. या अलीकडील घटनांनंतर, परिसरातील लोकांना असुरक्षित वाटत आहे. एक महिला म्हणून मला एकटी घरी जाताना काही सुरक्षा खबरदारी घेणे आवश्यक आहे. मला यापूर्वी कधीही याची गरज वाटली नव्हती; परंतु आता मला असुरक्षित वाटते.”