Aai Kuthe Kaay Karte Fame Rupali Bhosle New Project : छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिका सुरू होत आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘हळद रुसली कुंकू हसलं’, तर ‘झी मराठी’वरुन ‘कमळी’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ यांसारख्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या मापलिकांतून कोणते नवीन चेहरे किंवा कोणते प्रसिद्ध कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या मालिकांमध्ये काही प्रसिद्ध कलाकारांची वर्णी लागली आहे.

छोट्या पडद्यावरील या नवीन मालिकांमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान, सुबोध भावे, समृद्धी केळकर, अभिषेक रहाळकर, निखिल दामले, विजया बाबर हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील अजून एक प्रसिद्ध अभिनेत्री एका नव्या मालिकेतून झळणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसले.

रुपालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने ती लवकरच एका नव्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,असं सांगितलं आहे. अभिनेत्रीनं तिचा एक फोटो पोस्ट करीत त्याला प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारं कॅप्शन दिली आहे.

रुपालीनं तिच्या कॅप्शनमधून म्हटलं आहे, “पेशन्स इज द की. त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी तुम्हाला नक्की मिळतात. कारण- योग्य वेळी मिळालेली गोष्ट खूप सुंदर असते. आयुष्यावर प्रेम करा, आयुष्य तुमच्यावर प्रेम करेन”. पुढे रुपालीनं तिच्या कामाबद्दल सांगितलं आहे. तिनं “लवकरच येतेय काहीतरी भन्नाट घेऊन मालिका की नाटक? सांगते लवकरच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्याबरोबर असणारच आहे याची खात्री आहे,” असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे आता रुपाली भोसले कोणत्या नवीन मालिका किंवा नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. रुपालीची नवीन कलाकृती जर मालिका असेल, तर ती कोणत्या मालिकेतून झळकणार हे पाहणं रंजक ठरेल. यापूर्वी रुपालीनं ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेनं दीर्घकाळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. तर, नुकतीच ती ‘शिट्टी वाजवली रे’ या कार्यक्रमात झळकली.