Star Pravah : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच अभिनेत्री समृद्धी केळकरची ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत समृद्धीसह लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही मालिका ७ जुलैपासून दुपारच्या सत्रात प्रक्षेपित केली जाणार आहे. या मालिकेबद्दल सध्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. समृद्धी आणि अभिषेक यांच्यासह आणखी एक अभिनेत्री या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात…

‘सर्जा’ सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आणि अनेक मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंखे लवकरच ‘स्टार प्रवाह’च्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत झळकणार आहेत.

बाळजाबाईचा गावात प्रचंड दबदबा आहे. ती गावाची जणू आईच आहे. बाळजाबाई अत्यंत प्रेमळ भासत असली तरी कमालीची सत्तालोलुप आणि पाताळयंत्री आहे. तिचं ध्येय साध्य करण्यासाठी ती काहीही करु शकते. घर आणि गावातील सगळी सूत्र तिच्या हातात आहेत. सरपंच पदाची निवडणूक जिंकण्याचं तिचं ध्येय असतं. ही निवडणूक जिंकण्यासाठी ती आपला मुलगा दुष्यंत आणि गावातील सर्वसामान्य शेतकरी मुलगी कृष्णाचं लग्न करुन देण्यासही तयार होते.

बाळजाबाईची ही भूमिका साकारत असलेल्या पूजा पवार यांनी ‘स्टार प्रवाह’च्या ‘आई कुठे काय करते’ ( रेवती – अंकिताची आई ) मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. जवळपास तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेतून भेटीला येणार आहेत. याशिवाय त्या ‘कलर्स मराठी’च्या काव्यांजली मालिकेत सुद्धा झळकल्या होत्या.

‘बाळजाबाई’ या भूमिकेबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “या मालिकेत मी खलनायिका साकारत आहे. एक अभिनेत्री म्हणून खलनायिका साकारताना कस लागतो. बाळजाबाई हे अत्यंत प्रभावशाली असं पात्र आहे. दोन मुखवटे घेऊन वावरणारी… म्हणजे समाजात वावरताना ती जितकी नम्रपणे वागते तितकीच ती धूर्त आहे. बाळजाबाईचं वागणं, बोलणं, तिचं रहाणीमान या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करतेय. बाळजाबाई हे पात्र प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही नवीन मालिका ७ जुलैपासून दुपारी १ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.