‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज या पर्वाचा विजेता प्रेक्षकांना कळणार आहे. अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, अक्षय केळकर आणि किरण माने यांच्यात हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. अपूर्वा नेमळेकर या पर्वाची विजेती व्हावी असं अनेकांना वाटत आहे. ती विजेती व्हावी यासाठी तिचे चाहते प्रयत्नही करत आहेत. आता अशातच अपूर्वाने महाअंतिम सोहळ्यापूर्वी या पर्वात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांसाठी एक खास पोस्ट शेअर केली.

अपूर्वा नेमळेकर पहिल्या दिवसापासूनच या घरात चर्चेत होती. तिच्या खेळाने त्याचप्रमाणे तिने या घरामध्ये केलेल्या वक्तव्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. जसजसा या पर्वाचा ग्रँड फिनाले जवळ येऊ लागला तसतशी ती भावनिक होतानाही पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात नुकतंच एका रियुनियनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी घराबाहेर गेलेले सर्वच स्पर्धक पुन्हा एकदा एकत्र आले आणि त्यांनी धमाल केली.

हेही वाचा : महाअंतिम सोहळ्याआधीच स्मिता गोंदकरने सांगून टाकलं ‘बिग बॉस ४’च्या विजेत्या स्पर्धकाचं नाव, म्हणाली…

या रियुनियनदरम्यानचे काही खास क्षण अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. एक व्हिडीओ पोस्ट करत तिने लिहिलं, “वाद विवाद खूप झाले, जिंकण्याच्या शर्यतीत नॉमिनेट केले पण शेवटी आम्ही एकत्र प्रवास सुरू केला होता, जिव्हाळा तर असलाच पाहिजे. बिग बॉस मराठी पर्व ४ चे हे कुटुंब ९९ व्या दिवशी पुन्हा एकत्र आले! अगदी एका सिनेमातील उत्तरार्धात सर्व पात्र एकत्र येतात तसेच काहीसे ! आता खऱ्या अर्थाने All Is Well झालं.”

आणखी वाचा : “अचानक मोठी झाली यार…”; लेकीसाठी पोस्ट लिहीत स्वप्निल जोशी भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर कमेंट करत अपूर्वाचं घरातील सर्व सदस्यांची असलेल्या बाँडिंग, प्रत्येकाबद्दल तिला वाटणारी आपुलकी याचं नेटकरी कौतुक करत आहेत. त्याचप्रमाणे महाअंतिम सोहळ्यासाठी तिला शुभेच्छाही देत आहेत. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.