‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक आणि ‘दुबईचा छोटा भाईजान’ अब्दु रोजिकने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच अब्दु बोहल्यावर चढणार आहे. छोट्या भाईजानने आयुष्यभराची जोडीदार शोधली आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला असून जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अब्दु म्हणतोय, “हॅलो. सगळेजण कसे आहात? मी अब्दु रोजिक. मी २० वर्षांचा आहे, हे तुम्हाला माहित आहेच. माझं स्वप्न होतं की, माझ्या आयुष्यात माझ्यावर प्रेम करणारी आणि माझा आदर करणारी मुलगी मिळू दे. आता मला ती मुलगी भेटली आहे; जी माझा आदर करते आणि माझ्यावर खूप प्रेम करते. मला माहित नाही कसं सांगू? पण मी खूप उत्साही आहे.” यानंतर अब्दु होणाऱ्या बायकोसाठी घेतलेली अंगठी दाखवतो.

हेही वाचा – Bigg Boss Ott 3: ‘हीरामंडी’मधील इंटीमेट सीनमुळे चर्चेत आलेल्या जेनस शाहला ‘बिग बॉस ओटीटी ३’ची ऑफर!

हा व्हिडीओ शेअर करत अब्दुने लिहिलं आहे, “मी माझ्या आयुष्यात कधी विचार केला नव्हता की, मी इतका नशीबवान असेन. कारण माझ्यावर खूप प्रेम करणारी व आदर करणारी आयुष्यभराची जोडीदार मला भेटली आहे. ७ जुलै तारीख लक्षात ठेवा. मी इतका आनंदी आहे की हा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.”

अब्दुची होणारी बायको कोण आहे?

माहितीनुसार, अब्दु रोजिक अमीरातमधली मुलगी अमीराबरोबर लग्न करणार आहे. अमीरातमध्येच अब्दुचं लग्न होणार आहे. अब्दुच्या होणाऱ्या बायकोचं वय १९ असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिव ठाकरे व अब्दु रोजिकला ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. एका हाय प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग केससाठी या दोघांना साक्ष देण्यासाठी बोलावणं धाडण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर हे प्रकरण कुख्यात ड्रग माफिया अली असगर शिराजी याच्याशी संबंधित असल्याचंही सांगितलं.

हेही वाचा – ‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर MC Stanचा झालं ब्रेकअप, भावुक पोस्ट करत म्हणाला, “जेव्हा दुर्लक्ष केलं जातं आणि…”

अली असगर शिराजी ‘Hustlers’ Hospitality Pvt Ltd’ नावाची कंपनी चालवत होता आणि या कंपनीतून वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सना आर्थिक सहाय्य पुरवलं जात असे. या स्टार्ट-अप्समध्ये शिव ठाकरेचा ‘ठाकरे चाय अँड स्नॅक्स’ हे आऊटलेट आणि अब्दु रोजिकचे ‘बुर्गीर’ हा ब्रँडदेखील सामील होतं. ड्रग्सच्या व्यवसायातून शिराजीने या अशा उद्योगांमध्ये पैसे गुंतवले. जेव्हा शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना या प्रकरणाविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने त्यांचे शिराजी व त्याच्या कंपनीबरोबरचे करार रद्द केले.