गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वच गणेशभक्तांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. सर्वसामान्यांपासून ते मोठमोठे कलाकारही बाप्पाला निरोप देताना भावूक झाले. कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवलेली श्रेया बुगडे बाप्पाला निरोप देताना भावूक झाली. यानिमित्ताने तिने बाप्पासाठी एक खास पोस्ट केली आहे.
श्रेया बुगडे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे ती घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती प्रेक्षकांना खळखळवून हसवते. नुकतंच श्रेयाने तिच्या घरातील गणपतीचा एक छान फोटो शेअर केला आहे. याबरोबरच तिने लांबलचक पोस्ट लिहित तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा : ‘स्टार प्रवाह’वर लवकरच येणार नवी मालिका; निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकरने केलं जाहीर
श्रेया बुगडेची पोस्ट
“काल ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ असे म्हणत तुझा निरोप घेतला .. आणि नेहमी सारखे अश्रू अनावर झाले ….
गेल्या इतक्या वर्षात ह्या ५ दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना काही मागितल्याचं मला आठवत नाही … पण एक सांगेन ह्या ५ दिवसात तुझ्यायेण्याने जेवढा आनंद मला मिळतो तो मला कधीच शब्दात मांडता येणार नाही ..
तुझ्या निमित्ताने सगळी माझी प्रेमाची माणसं एकत्र येतात ..तुझं कौतुक करतात ..तेव्हा मनाला होणारा आनंद गगनात मावेनासा असतो ..हि प्रथा वर्षांनुवर्षे अशीच चालू ठेव ..तुझी सेवा करायची संधी आम्हला देत राहा !
विसर्जन फक्त म्हणायला रे , बाकी माझ्यासोबत तू असतोसच कि …कायम दिसत राहतोस ..कधी कामात ,कधी माणसांमध्ये …
माझ्यावर अतोनात निःस्वार्थ प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत..आणि हा तू मला दिलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे .
Mumma म्हणते तसं “जाते नाही येते म्हणावं गं”
मग आता ..ये लौकर पुढच्या वर्षी आनंदाने …
तुला सगळ्यासाठी खूप THANK YOU! आणि एक घट्ट मिठी (तुला तर माहितीये आपलं)
सुखी राहा ! आनंदात राहा ..तुला खूप prem.. भेटूच”, असे श्रेयाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान श्रेयाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यावर ‘खूप छान लिहिलं आहे’, ‘सुरेख कॅप्शन’, अशा कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. श्रेया बुगडेच्या घरी दरवर्षी पाच दिवस गणपती बाप्पा विराजमान होतो. श्रेयाचं आणि बाप्पाचं नातं फारच खास आहे.