Nimrit Kaur Ahluwalia Was Molested In Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात एका अभिनेत्रीबरोबर धक्कादायक प्रकार घडला होता. १९ वर्षांची असताना ही अभिनेत्री एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात गेली होती. तिथे तिच्याबरोबर एका पुरुषाने गैरवर्तन केलं होतं. जे घडलं ते इतकं भयंकर होतं की न्यायालयातच रडले होते, असंही तिने सांगितलं.
‘बिग बॉस १६’ मधून चर्चेत आलेली अभिनेत्री निमृत कौर अहलुवालियाने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने तिला सर्वोच्च न्यायालयात आलेला एक वाईट अनुभव सांगितला आहे. कोर्टात गर्दी होती आणि तिच्या नितंबावर कुणीतरी हात ठेवला. तिला वाटलं की गर्दीत कुणीतरी तिला चुकून स्पर्श केला असावा, यामुळे ती तिथून कोर्टातील एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली.
निमृत कौर अहलूवालिया हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की एक माणूस तिचा पाठलाग करत होता, हे पाहून तिला धक्का बसला. त्याने फक्त तिच्या नितंबाना स्पर्शच केला नाही, तर तिच्या शर्टमध्येही हात टाकण्याचा प्रयत्न केला.
मी मागे वळून पाहिलं तर….
“मला माझ्या नितंबावर कोणाचा तरी हात असल्याचं जाणवलं. मग मला वाटलं की कदाचित फार विचार करत आहे, कारण गर्दीमुळे सर्वजण एकमेकांच्या खूप जवळ होते. मी मागे वळून पाहिले तर तो माणूस सरळ समोर पाहत होता आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होता,” असं निमृत म्हणाली.
निमृत कौरला बसलेला धक्का
निमृत पुढे म्हणाली, “मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. मी विचार केला की चला आपण आपली जागा बदलूया. मी तिथून दूर जाऊन एका कोपऱ्यात उभे राहिले. तिथेही मला माझ्या हातावर कोणीतरी स्पर्श केल्याचं जाणवले आणि तो तोच माणूस होता. तो माझा पाठलाग करत तिथे आला होता, नंतर त्याने पुन्हा माझ्या नितंबांना स्पर्श केला. मला या प्रकाराचा इतका मोठा धक्का बसला की मला रडायला आलं.”
महिला वकिलाने केलेली मदत
निमृतने सांगितलं की त्यानंतर एका ज्येष्ठ महिला वकिलाने तिच्याकडे पाहिलं आणि तिला अस्वस्थ वाटत आहे का? असं विचारलं. निमृतने होकार दिल्यावर त्या महिला वकिलाने त्या माणसाला सुनावलं. इतकंच नाही तर त्याला कानशिलात लगावली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आणि प्रकरण मिटवण्यात आलं.
निमृत ही घटना आठवून भावुक झाली. तसेच मदत करणाऱ्या महिला वकिलाचे तिने आभार मानले. “तुम्ही सुप्रीम कोर्टात असल्यावर सुरक्षित आहात, असं तुम्हाला वाटतं. पण तरीही हे घडलं,” असं निमृत म्हणाली.
निमृत कौर अहलूवालियाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘छोटी सरदारनी’ मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिने ‘बिग बॉस 16’ व ‘खतरों के खिलाड़ी 14’ हे रिअॅलिटी शो केले. सध्या ती तिच्या पहिल्या पंजाबी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘शौंकी सरदार’ नावाचा तिचा चित्रपट १६ मे रोजी प्रदर्शित झालाय. या चित्रपटात बाबू मान व गुरू रंधावा मुख्य भूमिका साकारत आहेत.