छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या एकाच कारणांमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. मात्र निर्माते असित मोदी यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यातच आता जेनिफरच्या एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे.
जेनिफर मिस्त्री ही या प्रकरणानंतर सोशल मीडियावर सक्रिय झाली. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओदेखील शेअर केला. त्यात तिने अप्रत्यक्षरीत्या निर्माते असित मोदींवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक टिप्पणी केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. इतकंच नव्हे तर त्यांनी बऱ्याचदा तिच्याबरोबर फ्लर्ट करायचा प्रयत्नही केल्याचं समोर आलं.
आणखी वाचा : १४ वर्षांपूर्वी बलात्कार केसप्रकरणी दोषी ठरलेला अभिनेता शायनी अहुजा सध्या आहे कुठे? करतोय ‘हे’ काम
यानंतर हे प्रकरण चांगलंच वाढलं, असित मोदी यांनी अभिनेत्रीसह लैंगिक संबंध ठेवल्याची चर्चा होऊ लागली. नुकतंच जेनिफर मिस्त्रीने याबद्दल ‘एएनआय’शी संवाद साधताना या गोष्टी खोडून काढल्या आहेत. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “मी नेमकं काय बोलली आहे ते असितजी, जतिन आणि सोहेल या तिघांनाही चांगलंच माहिती आहे. ४ एप्रिलला मी पहिल्या नोटीसचा ड्राफ्ट पाठवला. त्यावर त्यांनी मला लगेच उत्तर दिलं, मी धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळू इच्छित असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर मी थेट ८ एप्रिलला कायदेशीर नोटीस पाठवली. त्यांनी ८ मे रोजी याविषयी पोलिसांमध्ये त्यांचं स्टेटमेंट दिलं, इतके दिवस हे शांत का होते?”
पुढे ती म्हणाली, “आज मीडियामधून सत्य लोकांपर्यंत पोहोचत आहे. यासाठी मी मीडियाचे खूप आभार मानते, आणि जे लोक या बाबतीत खोट्या बातम्या पसरवत आहेत, असितजी यांनी माझ्याबरोबर लैंगिक संबंध बनवायचा प्रयत्न केला, अशा बातम्या जे देत आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत. असितजी यांनी फक्त लैंगिक टिप्पणी केली होती. त्यामुळे विनाकारण कोणाचीही प्रतिमा मलिन करू नका आणि केवळ खरी माहितीच समोर येऊ द्या.” या प्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी पैशासाठी नव्हे तर सत्यासाठी करत असल्याचं जेनिफर मिस्त्री बन्सीवालने स्पष्ट केलं आहे.