Kumkum Bhagya Fame Krishna Kaul Family in Jammu : भारत- पाकिस्तान दरम्यानचा तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. पाकिस्तानने सीमेलगतच्या राज्यांमध्ये ड्रोन हल्ल्यांचं प्रमाण वाढवलं आहे. जम्मू व काश्मिरला पाकिस्तान प्रामुख्याने लक्ष्य करतंय. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.
अनेक टीव्ही कलाकार जम्मू- काश्मीरचे आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेता क्रिष्णा कौल मूळचा जम्मूचा आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात कृष्णाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. कृष्णाने भारतीय संरक्षण दलाचे आभार मानले आहेत.
क्रिष्णाला कुटुंबाने काय सांगितलं?
ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान कृष्णाने जम्मूमधील त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि त्यांची विचारपूस केली. कुटुंबियांनी जे सांगितलं ते ऐकून मोठा दिलासा मिळाला, असं कृष्णाने सांगितलं. “जम्मूमधील माझ्या कुटुंबियांशी बोललो. त्यांना त्यांच्या खोलीत स्फोटांचा मोठा आवाज ऐकू येत आहे आणि त्यांच्या खिडक्यांमधून ड्रोन दिसत आहेत. सगळीकडे ब्लॅकआउट आहे. पण असं असलं तरी ते घाबरलेले दिसत नाहीत, त्यांना आपल्या सुरक्षा दलांवर आणि पंतप्रधान मोदींवर प्रचंड विश्वास आहे. भारतीय संरक्षण दलांचे आभार,” असं कृष्णा कौलने म्हटलं आहे.

कृष्णा कौलसह अली गोनी व कॉमेडियन समय रैनाचे कुटुंबीयही जम्मूमध्ये राहतात. अली गोनी शूटिंगनिमित्त विदेशात आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानचा संघर्ष वाढल्यानंतर अलीला कुटुंबाची काळजी वाटत होती. त्याने पोस्ट करून कुटुंबीय जम्मूमध्ये सुरक्षित आहेत, अशी माहिती दिली व भारतीय संरक्षण दलाचे आभार मानले.
समय रैनाने केलेली पोस्ट
समय रैनानेही जम्मूतील परिस्थिती सांगितली. “माझ्या वडिलांनी रात्री जम्मूहून मला शेवटचा फोन केला आणि गूड नाईट म्हणाले. त्यांच्या आवाजात शांतता आणि स्थिरता होती. त्यांनी मला झोपायला जा आणि काळजी करू नकोस असं सांगितलं. भारतीय सैन्य इथे सर्वकाही योग्यरित्या हाताळत आहेत. त्यांच्या आवाजातील शांततेनं माझं अस्वस्थ मन शांत झालं. वडिलांशी बोलल्यानंतर, मी मुंबईतील माझ्या घरातील लाईट बंद केली आणि खिडकीचे पडदे लावले. माझ्या खिडकीबाहेर, माझ्या शेजाऱ्यांचे लाईट्स चालू होते.
मला माझ्या शेजाऱ्यांबद्दल खूप कमी माहिती आहे, इथे असंच घडतं. मला आश्चर्य वाटतं की, त्यांचंही कुटुंब जम्मूमध्ये आहे का, कदाचित पठाणकोटमध्ये, किंवा कदाचित तो एका शूर सैनिकाचा मुलगा असेल, जो आज रात्री त्याच्या वडिलांच्या सकाळच्या फोनची वाट पाहत झोपणार नाही. भारतीय सैनिक आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या कुटुंबांबद्दल मला अत्यंत आदर आहे,” असं समयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं.