Zee Marathi Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सिद्धूचा प्रेमभंग झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. पूर्वीशी अचानक साखरपुडा झाल्यामुळे सिद्धू प्रचंड अस्वस्थ असतो. कारण, त्याचं खरं प्रेम भावनावर असतं. वडिलांच्या राजकीय मैत्रीमुळे सिद्धू-पूर्वी एकमेकांशी साखरपुडा करतात. आता पुढे, जाऊन या दोघांच्या नात्यात काय वळण येणार? सिद्धूचं प्रेम भावनापर्यंत पोहोचणार का? या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकीकडे सिद्धू-भावनाच्या नात्यात चढउतार येत असताना दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून दु:खी असलेल्या जान्हवीच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येणार आहेत. लग्न झाल्यावर पहिल्या दिवसापासून जयंत जान्हवीला प्रचंड त्रास देत होता. पण, आता अचानक त्याच्यात सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे.

जयंतने लग्न झाल्यावर दूधात टाकून झुरळ खाल्लेलं असतं, त्याला बायकोने माहेरच्या लोकांशी संपर्कात राहिलेलं आवडत नसतं. जान्हवीने कोणाशी बोलू नये, कोणत्याही मुलाशी तिची मैत्री होऊ नये याची जयंत खबरदारी घेत असतो. जान्हवी जरातरी चुकली की, जयंत तिला शिक्षा देत असतो. याच त्रासाला कंटाळून ती घरातून निघून जाते. पण, जयंतच्या काळजीत पुन्हा घरी येते.

आपल्या वागण्याने जान्हवीला बराच त्रास झाला याची जाणीव जयंतला ती घर सोडून गेल्यावर होते. जान्हवी पुन्हा घरी परतल्यावर तो तिला इथून पुढे चांगलं वागण्याचं वचन देत. आता नेहमीच विकृत वागणारा जयंत सध्या काहीसा चांगला वागत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे आणि आता येत्या भागांत प्रेक्षकांना जयंतची हळवी बाजू देखील पाहायला मिळणार आहे.

जयंतसाठी सरप्राइज म्हणून जान्हवी काही खास गोष्टी प्लॅन करते. ती नवऱ्यासाठी फोडणीची पोळी करणार आहे. याशिवाय जयंतला शू-लेस बांधण्यात सुद्धा ती मदत करते. यानंतर जयंतला अश्रू अनावर होतात, त्याला त्याच्या आईची आठवण येते. जयंत जान्हवीला मिठी मारून रडू लागतो. नवऱ्याला पाहून जान्हवीचे डोळे देखील पाणावतात. जयंतच्या वाट्याला न आलेलं सगळं सुख त्याला द्यायचं असा निर्णय जान्हवी घेते आणि नवऱ्याला धीर देते.

नेटकऱ्यांनी या प्रोमो कौतुकाचा वर्षाव केला आहे. “प्लीज शेवटपर्यंत असंच चांगलं दाखवा”, “जयंतची Acting मस्तच आहे”, “असेच दोघेही कायम एकत्र राहा”, “जयंत एवढा कसा बदलला…चांगलंय असाच राहा” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग १८ आणि १९ एप्रिल रोजी रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. आता जान्हवीसमोर हळवी बाजू आल्यावर जयंतच्या वागण्यात आणखी काय-काय बदल होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.