प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. ‘धर्मवीर’च्य पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. राजकीय क्षेत्रातील घडामोडी या चित्रपटात उलगडल्या गेल्या. महाराष्ट्रात राजकारण म्हटलं आणि ठाकरे हे नाव आलं नाही, असं होणार नाही; पण केवळ राज्याच्या राजकारणातच नाही, तर दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनातही ठाकरे कुटुंबीयांचा महत्त्वाचा स्थान होता.
‘धर्मवीर’ चित्रपटात त्यामुळेच ठाकरे कुटुंबीय व आनंद दिघे यांची काही एकत्रित दृश्यं दाखविण्यात आली. त्यामध्ये आनंद दिघे रुग्णालयामध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे आल्याचं पाहायला मिळतं. चित्रपटातील हा सीन तेव्हा प्रचंड गाजला होता. या चित्रपटात राज ठाकरेंची भूमिका ज्या अभिनेत्यानं साकारली त्यानं नुकताच त्याचा या चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
‘अल्ट्रा मराठी शोबझ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता अनुज प्रभूनं याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, “जेव्हा मला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं तेव्हा नेमकी कोणत्या भूमिकेसाठी ऑडिशन आहे याबाबत सांगण्यात आलं नव्हतं. तिथे गेल्यानंतर जेव्हा समजलं की, राज ठाकरेंची भूमिका असणार आहे तेव्हा मी अर्थात भारावून गेलो होतो. कारण- ते एक असं व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांचा एक ऑरा आहे. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक माणसाचं राज ठाकरेंबद्दल काहीतरी मत असतंच. त्यामुळे काहीही जरी चुकलं, तरी लगेच अशी चर्चा सुरू होईल की हा माणूस राजसाहेब वाटला नाही. त्यामुळे थोडीशी भीती होती.”
पुढे अनुज म्हणाला, “मी ऑडिशन दिली आणि राज ठाकरेंच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली; पण प्रवीण तरडे सरांनी ज्या पद्धतीनं ती भूमिका माझ्याकडून करून घेतली, त्यामुळेच त्या भूमिकेकडे लक्ष वेधलं गेलं आणि त्यामुळेच माझ्या करिअरमध्ये मला काम मिळणं थोडं सोपं गेलं. मी कामं करतच होतो; पण या भूमिकेमुळे थोडी गती मिळाली आणि मला ओळख मिळाली.
दरम्यान, अनुज प्रभू सध्या ‘झी मराठी’वरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत विश्वा ही भूमिका साकारत आहे. जान्हवीच्या प्रेमात वेडा झालेला विश्वा मध्यंतरी प्रचंड व्यसनाधीन झाल्याचा पाहायला मिळालं. त्यावेळी त्याच्या या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं.