Marathi Actor Post : कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील शिवानी सोनार आणि मनिराज पवार यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. या दोघांशिवाय मालिकेत पार्थ घाटगेही मुख्य भूमिकेत होता. मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच आवडली होती. यानंतर अभिनेता अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनयाबरोबरच पार्थ सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो.

सोशल मीडियावर पार्थ अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या काही पोस्ट लक्षवेधी असतात. अशातच पार्थने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून पार्थने तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केलं आहे. तसंच जातीय राजकरणावरही पार्थने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काय आहे ही पोस्ट? चला जाणून घेऊ…

या पोस्टमध्ये पार्थ असं म्हणतो, “ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र । चांडाळा आहे अधिकार ।। बालें नारी नर । आदी करोनी वेश्याही ।।’ असं बोलुन तुकोबा रायांनी वर्षांवर्षे परमात्मा आणि ज्ञानप्राप्ती आणि बहुजनांमध्ये असणाऱ्या कर्मठतने बांधलेल्या अन्यायाची भिंत मोडून काढली. त्यांचा बंड मोडुन काढायचे असंख्य प्रयत्न झाले, प्रतिगामी आणि कर्मठ विचारांच्या लोकांच्या मुसक्या आवळुन तुकोबांची लेखणी सगळ्यांना पुरुन उरली.”

पार्थ घाटगे इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे तो म्हणतो, “त्यांना संपवायला निघालेले सगळे संपले, पण तुकोबा अजुनही जिवंत आहेत. कारण तुकोबांचा लढा हा प्रेमाचा-जिव्हाळ्याचा होता. पिचलेल्या-भरडलेल्या वर्गाचे ते नायक होते. आयुष्यभर आपल्या जातीमुळे खचलेल्या त्या प्रत्येक मनाला, त्याच्या आतसुद्धा पांडुरंग आहे याची जाणीव करुन देणारे तुकोबा होते. बहुजनांच्या कित्येक पिढ्यांच्या जखमांवरची हलकी फुंकर म्हणजे तुकोबा होते. जिवंतपणीच प्रत्येकातल्या पांडुरंगाला पाहुन, या समाजाला वैकुंठ बनवू पाहणारे तुकोबा होते.”

यानंतर पार्थने म्हटलंय, “आज दोन्ही राजकीय बाजू त्यांच्या फायद्यासाठी जाती-जातींमधे फुट पाडु पाहत आहेत. इन्स्टाग्रामच्या बायोमधे स्वतःची जात अभिमानानं लिहिणारी आपली पिढी याला बळी पडत आहे. तुकोबांची गाथा का तरली? याचं उत्तर आजची सामाजिक-राजकीय परिस्थिती पाहून कळत आहे. आज तुकोबांच्या विचारांची, त्यांच्या गाथेची खरी गरज आहे.

यानंतर त्याने म्हटलं, “आजच्या राजकीय परिस्थितीत मनात द्वेषाला स्थान न देणं, जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकात तो आहे याची जाण ठेऊन फक्त प्रेम करायचं आहे. द्वेष करणं सोपं आहे. प्रेमापेक्षा जास्त आंधळा द्वेष आहे. या अंधाराच्या काळात, तुकोबांनी आपल्या हाती मशाल दिलेली आहे. आपल्याला प्रत्येकातला माणुस पहायचा आहे आणि प्रत्येकात पांडुरंग. जात नावाची किड एकदा निघुन गेली ना, तर मग आपल्या समाजाचं प्रभु श्रीरामचंद्रांचं रामराज्य, कान्हाचं गोकुळ, शिवरायांचं स्वराज्य, आणि तुकोबांचं वैकुंठ तयार व्हायला वेळ लागणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे पार्थ म्हणतो, “हे सगळं लिहायचं कारण असं की, श्रीक्षेत्र देहुला जाण्याचा योग आला आणि तिथे जाऊन आल्यावर व्यक्त व्हावंसं वाटलं. तुकोबांच्या शब्दांमधला विद्रोह हा आपल्या प्रत्येकात ऊतरो, आणि आपल्यामध्ये ज्या भिंती बांधल्या जात आहेत, त्या तोडायचं बळ आपल्यात येवो. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय शिवराय. राम कृष्ण हरी.”