Nilesh Sabale & Sharad Upadhye : ‘चला हवा येऊ द्या’ फेम डॉ. निलेश साबळेवर प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबूक पोस्ट शेअर करत टीका केली होती. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.
‘चला हवा येऊ द्या’मधून निलेश साबळेला डच्चू दिला, त्याच्या डोक्यात हवा गेली होती, काही वर्षांपूर्वी त्याने सेटवर व्यवस्थित वागणूक दिली नव्हती…स्माइलही केलं नव्हतं असे आरोप उपाध्येंनी त्यांच्या पोस्टमध्ये केले होते. या सगळ्या आरोपांवर निलेश साबळेने व्हिडीओ शेअर करत सविस्तर उत्तर दिलं आहे.
निलेशने त्याची बाजू व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केल्यावर यावर असंख्य मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. किरण माने, सलील कुलकर्णी, शिल्पा नवलकर, कविता मेढेकर, अद्वैत दादरकर, अभिजीत केळकर या सगळ्या कलाकारांनी निलेशला पाठिंबा दिला आहे. आता या प्रकरणावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम लोकप्रिय अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं आहे.
स्वप्नील राजशेखर यांची पोस्ट
या प्रकरणात, उपाध्येंना ज्या पद्धतीच्या अटेंशनची सवय वर्षानुवर्षे लागली असेल तसं आणि त्या प्रमाणात अटेंशन ‘झी’च्या त्या सेटअपमध्ये न मिळणं… हे सुध्दा या सगळ्याचं मूळ असू शकेल…
‘हवा येऊ द्या’ हा वर्षानुवर्षे निलेश साबळेचा बराचसा एकखांबी तंबु राहिला आहे. आता पाहुयात लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशा त्यातल्या महत्वाच्या क्रिएटिव्ह बाजू एकत्रित सांभाळताना….
या शोमधल्या सगळ्या अभिनेत्यांना तालीम आणि सादरीकरण हे काम असतं… त्यामुळे कदाचित त्यांना शूटिंग दरम्यान रिकामा वेळ मिळू शकेल. पण, लेखक, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक… म्हणजे एकाअर्थी त्या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा असणाऱ्या निलेश साबळेला तितका फावला वेळ सेटवर मिळण्याची आणि त्याने सतत हसऱ्या चेहऱ्याने ऑफस्क्रीन सर्वाना अटेंड करत वावरत असण्याची अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे. त्याला टेंशन किती असेल याची कल्पना कुणालाही करता येऊ शकते…
पण, उपाध्येंना या माध्यमाची माहिती आणि सवय नसल्याने, ते स्वतः सहसा एकपात्री सादरीकरण करत असल्याने त्यांची गफलत झालेली असावी…
तरीही, दहा वर्षे मनात राग साठवून राहणे आणि तो असा जाहीर व्यक्त करणे हे उपाध्येंसारख्या वयोवृद्धाकडून मुळीच अपेक्षित नाही….
शिवाय समजा, खरंच जर उपाध्येंचा समज झाला तसं निलेश साबळेला वगळून तो कार्यक्रम सुरु होत असता, (जे खरं नाही हे निलेशनी आपल्या व्हिडीओतून सांगितलं आहेच) तर ते निलेश साबळेसाठी आनंदाचं नक्की नसतं..
अशावेळी ‘बरं झालं, डच्चू दिला’ वगैरे पध्दतीने व्यक्त होणं हे सभ्यतेला धरुनही नव्हे!
तस्मात माझ्या मते, उपाध्येंचा राशीयोग या दोन-तीन दिवसात काही बरा नव्हता!!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या सीझनमध्ये यंदा कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे हे कलाकार झळकणार आहेत. यावर्षी या शोचं स्वरुप काहीसं बदलण्यात आलं आहे. विविध शहरांमध्ये या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या ऑडिशन्स सुरू आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यावर्षी लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे.