मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. निरनिराळे रील आणि फोटो ते शेअर करताना दिसतात. अनेकदा या व्हिडीओवरून नेटकरी त्यांना ट्रोलही करतात. दरम्यान, ऐश्वर्या नारकर पुन्हा एका नव्या व्हिडीओमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.
ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर डान्सचा व्हिडओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या एका कार्यक्रमासाठी डान्सचा सराव करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिलं, “डान्स हा खऱा स्ट्रगल आहे.” ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एका युजरने कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांना “आजी देव देव करा” असा सल्ला दिला आहे. या युजरला ऐश्वर्या नारकर यांनी “अरे बाळा, तुझ्या देवाने तुला सद्बुद्धी नाही का दिली?” असं म्हणत चांगलंच सुनावलं आहे. तर आणखी एका युजरने “ऐश्वर्या नारकर गैरहजर असतील देव सदबुद्धी वाटताना” अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने कमेंट करत “काशीला जायच्या वयात डान्स करणारी आज्जी. आज्जी जोमात बाकी सगळे कोमात”, असं लिहिलं आहे.”
दरम्यान, या व्हिडीओवर इतर युजर्सनी कमेंट करत ऐश्वर्या नारकर यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडेनेही या व्हिडीओवर इमोजी सेंड करत व्हिडीओला लाईक केलं आहे, तर काहींनी या व्हिडीओवर अप्रतिम, सुंदर अशी कमेंट केली आहे.