कोणतीही मालिका किंवा चित्रपट बघताना अनपेक्षित घटना घडत असतील, म्हणजे एखाद्या पात्राला रडू येत असतानाच मुसळधार पाऊस येणे. देवापुढे प्रार्थना करत असताना देवाला वाहिलेले फूल खाली पडणे, पात्राला भीती वाटत असतानाच सोसाट्याचा वारा सुटणे, अशा अनेक बाबींचे सामान्य प्रेक्षकांना आश्चर्य वाटत असते. नेमकं अगदी त्याच वेळेला कसं काय हे घडवून आणू शकत असतील, असा प्रश्नही त्यांना पडतो. आता हे सीन कसे शूट केले जातात, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या शूटिंगचा व्हिडीओ

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या सेटवरील काही शूटिंगचा व्हिडीओ ‘सनी द जुगाडू’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाऊस पडल्याचा सीन दाखवताना काय केले जाते. याबरोबरच जेव्हा आजी देवासमोर बसून पूजा करत आहे, त्यावेळी देवाला वाहिलेले फूल खाली कसे पडते हे पाहायला मिळत आहे. देवासमोर जेव्हा आजी हात जोडून बसल्यानंतर फूल खाली पडण्यासाठी त्यावर मागून फुंकर घातल्याचे पाहायला मिळत आहे, तर पाऊस पडत आहे असे दाखवण्यासाठी बाटलीतून पाणी फवारले जाते. हा व्हिडीओ शेअर करताना मालिकेची नायिका वल्लरी विराज आणि ‘नवरी मिळे हिटलरला’च्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. याबरोबरच, “जसं दिसतं तसं नसतं” अशी कॅप्शनदेखील दिली आहे. या व्हिडीओला ‘गोलमाल है सब गोलमाल है’ हे गाणं लावण्यात आलं आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेबद्दल बोलायचे तर अगदी कमी दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि ती लोकप्रिय ठरली. लोकांना आवडणाऱ्या मालिकेपैकी एक म्हणून ‘नवरी मिळे हिटलरला’चे नाव घेतले जाते. लीला आणि एजे या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. थोडी अल्लड, अवखळ, वेंधळी, सतत गोंधळ घालून ठेवणारी लीला तितकेच परफेक्ट आणि शिस्तप्रिय एजे अशी ही जोडी आहे, त्यामुळे सतत त्यांच्यात कुरबूरी चालू असतात. मात्र, वेळप्रसंगी एकमेकांना मदत करण्यासाठी ते धावून येतात. याबरोबरच आजी, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, त्यांचे नवरे, लीलाच्या माहेरची माणसं यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले आहेत. सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता टिकून राहिलेली पाहायला मिळते.

हेही वाचा: ‘या’ मराठी चित्रपटासाठी तीन दिग्गज गायकांनी पहिल्यांदाच एकत्र केलं पार्श्वगायन; सिनेमा पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या मालिकेत एजेने यशचे श्वेताबरोबर ठरवलेल्या लग्नामुळे लीला आणि त्याच्यामध्ये भांडण होत असलेले पाहायला मिळत आहे. कारण रेवती आणि यशचे एकमेकांवर प्रेम असते, त्यामुळे एजे आणि लीला या दोघांमध्ये कोण स्वत:चे म्हणणे खरे करून दाखवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.