Navri Mile Hitlerla Fame Actresses Reunion: आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकारांना एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. सध्या सोशल मीडियावर कलाकार फोटो, व्हिडीओ शेअर करत असल्याने कलाकारांच्या अनेक गोष्टी चाहत्यांना सहज समजतात.
अशाच एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री एकत्र आल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. ‘नवरी मिळे हिटलरला‘ या मालिकेतील सर्व अभिनेत्री नुकत्याच एकमेकींना भेटल्या होत्या, त्यांनी एकत्र फोटो काढले आहेत. मालिका संपली तरी त्यांच्यातील नाते, बॉण्डिंग आजही तसेच आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रींचे रियुनियन
अभिनेत्री वल्लरी विराजने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये वल्लरीसह, भूमिजा पाटील, भारती पाटील, शीतल क्षीरसागर, माधुरी भारती, शर्मिला शिंदे, आलापिनी या अभिनेत्री दिसत आहेत. हे फोटो शेअर करीत अभिनेत्रीने हे रियुनिअन गरजेचे होते असे लिहिले आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये वल्लरीने इतर अभिनेत्रींबरोबर वेगवेगळे फोटो काढल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, सर्वोत्तम वेळ असे लिहिले आहे; तर आणखी एका फोटोमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पोझ दिल्याचे दिसत असून, आम्ही झारा मॉडलेसारख्या पोझ देण्याचे सेशन केले असे लिहिले.

तसेच सानिका काशिकरला टॅग करत आम्हाला तुझी खूप आठवण आली, असेही वल्लरीने लिहिले आहे. सानिका काशिकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काम असल्याने ती सर्वांबरोबर हजर राहू शकली नाही असे लिहिले आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपणार हे समजल्यानंतर प्रेक्षकांनी ही मालिका संपवू नये अशी विनंती केल्याचे पाहायला मिळाले. तसेच, ही मालिका संपताना प्रेक्षक भावूक झाले होते.
मालिकेतील एजे-लीलाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच, इतर पात्रांनीदेखील प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. या कलाकारांनी पुन्हा एकत्र काम करावे, अशी चाहते इच्छा व्यक्त करताना दिसतात. कलाकारांच्या पोस्टवर अशा आशयाच्या कमेंट्स दिसतात. आता हे कलाकार कोणत्या भूमिकेतून, कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.