Paaru Aka Sharayu Sonawane : सध्याच्या काळात छोट्या पडद्यावरील मालिकांचं प्रक्षेपण आठवड्याचे सहा ते सात दिवस केलं जातं. दैनंदिन एपिसोड, १ तासांचे महाएपिसोड, जवळपास आठवडाभर चालणारा दोन मालिकांचा महासंगम यामुळे कलाकारांना सुट्ट्या मिळत नाहीत आणि यामुळे सगळेच कलाकार खूप व्यग्र असतात. शूटिंग लोकेशन घरापासून दूर असल्यास अनेकदा कलाकारांना सण-उत्सव साजरे करण्यासाठी घरी जाणंही शक्य होत नाही.
घराघरांत लोकप्रिय झालेल्या ‘पारू’ने यंदा सेटवरच वटपौर्णिमा साजरी केली. विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेचा सण मोठ्या हौसेने साजरा करतात. स्त्रिया नटून-थटून तयार होतात, वडाभोवती सात फेरे घेतात. यंदा अनेक मराठी अभिनेत्रींनी वटपौर्णिमा साजरी केली. मात्र, ‘पारू’ मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री शरयू सोनावणे हिने सेटवरच हा सण साजरा केला.
वटपौर्णिमेच्या पूजेचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने यावर “ऑन सेट” व “Long Distance” असे हॅशटॅग दिल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या कुटुंबीयांपासून कामानिमित्त दूर असल्याने अभिनेत्रीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘Long Distance’ म्हटलं आहे.
‘पारू’ फेम शरयू सोनावणेचा खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचा आहे तरी कोण?
शरयूच्या नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे. जयंत मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर, निर्माता आहे. अभिनेता उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत ‘अ पेईंग घोस्ट’ चित्रपटाच्या निर्मातीची धुरा जयंतने सांभाळली होती. याशिवाय उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, संजय जाधव, भरत गणेशपुरे अभिनीत ‘सूर सपाटा’ या चित्रपटाची निर्मिती देखील शरयूच्या नवऱ्याने केली होती. या चित्रपटात शरयू सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
दरम्यान, शरयू सोनावणे ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत शरयूसह अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत झळकत आहे.