‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या मुक्ता-सागरच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरू आहे. मालिकेत ‘मुक्ता’ची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान, तर ‘सागर’ हे पात्र अभिनेता राज हंचनाळे साकारत आहे. मालिकेत दोघांचेही स्वभाव पूर्णत: वेगवेगळे असतात. परंतु, सईवरच्या प्रेमापोटी दोघेही एकत्र येण्याचा निर्णय घेतात.
मुक्ता-सागरचा लग्नसोहळा ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत लवकरच थाटामाटात पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून या लाडक्या जोडीसाठी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकर यांच्या घरी केळवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. याची खास झलक त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.
हेही वाचा : शुभमंगल सावधान! थाटामाटात पार पडला मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेचा विवाहसोहळा, समोर आला पहिला फोटो
नलिनी मुंबईकर त्यांच्या चविष्ट व रुचकर जेवणाचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. याशिवाय त्या सर्वसामान्य गृहिणींना त्यांच्या रेसिपी व्हिडीओद्वारे काही टिप्स सुद्धा देतात. त्यांच्या आग्री-कोळी पाककृती प्रेक्षकांना विशेष पसंतीस उतरतात. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतील कोळी कुटुंबासाठी नलिनी मुंबईकरांनी केळवणाची खास तयारी केली होती.
केळीच्या पानावरचं रुचकर जेवण, मुक्ता-सागर यांचं नाव लिहिलेली रांगोळी अशी जय्यत तयारी नलिनीताईंनी मुक्ता-सागर तसेच कोळी कुटुंबासाठी केली होती. याचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : अरबाज खान तीन दिवसांनंतर करणार दुसरं लग्न? कोण आहे त्याची होणारी पत्नी? जाणून घ्या
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर मुक्ता-सागरच्या विवाह विशेष भागासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यावेळी लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कोळी कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने नटून थटून या लग्नाला उपस्थित राहणार आहे.