अभिनेता राम कपूर सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. किमान चार पिढ्या बसून खातील, इतकी संपत्ती आपल्याकडे असल्याचं त्याने म्हटलं आहे. राम कपूर व त्याची मराठमोठी पत्नी गौतमी दोघेही अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. राम हा आघाडीचा टीव्ही अभिनेता आहे.
राम कपूर व गौतमी यांना दोन अपत्ये आहे. त्यांच्या मुलीचं नाव सिया कपूर आहे. सिया अभ्यासात प्रचंड हुशार असल्याचं रामने सांगितलं.फराह खान नुकतीच राम कपूरच्या घरी गेली होती. तिथे तिने शूट केलेला व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये रामने त्याच्या घराबद्दल, पत्नी व मुलांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सियाने तिच्या आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत तब्बल ९७% गुण मिळवले आहेत, अशी बातमी रामने आनंदाने शेअर केली. न्यू यॉर्क विद्यापीठानंतर आता ती कोलंबिया विद्यापीठात शिकायला जाणार आहे, असंही त्याने सांगितलं. तो गमतीत म्हणाला, “मला ४७% मिळाले होते. ही माझी मुलगी कशी असू शकते?”
सियाने कमी केलं ३८ किलो वजन
सिया आणि तिचा भाऊ अक्स दोघेही फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून दूर असतात. राम व गौतमी कधी कधी आपल्या मुलांबद्दल रंजक, तसेच अभिमान वाटाव्या अशा गोष्टी शेअर करतात त्यामुळे ते चर्चेत येतात. मध्यंतरी गौतमी कपूरने सांगितलं होतं की सियाने तब्बल ३८ किलो वजन कमी केलं. त्यावेळी सियाची खूप चर्चा झाली होती. मुलीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून रामला प्रेरणा मिळाली आणि त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू झाला.
हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली, “रामला खरोखरच सियाने प्रेरणा दिली. तिने वजन कमी करण्याचा प्रवास त्याच्या आधी सुरू केला होता आणि त्यामुळे रामला खरोखरच प्रेरणा मिळाली. दृढनिश्चयामुळे काहीही शक्य होऊ शकतं हे सियाच्या प्रवासातून रामने पाहिलं.”
फराह खानच्या व्लॉगमध्ये राम कपूरच्या स्टायलिश व आलिशान घराची झलक पाहायला मिळाली. राम कपूर दक्षिण मुंबईत कुटुंबाबरोबर राहतो. त्याचे घर खूप प्रशस्त आहे. लिव्हिंग रूम खूप छान सजवलेली आहे. तसेच तिथे इन-हाऊस बारदेखील आहे. राम कपूरने नुकतीच Lamborghini Urus SE ही लक्झरी कार खरेदी केली. या कारची किंमत ५.२१ कोटी रुपये आहे.