Sanskrutik Kaladarpan Puraskar 2025 Star Pravah Winners : मराठी मनोरंजनसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी विशेष पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करून सन्मान केला जातो. नुकताच ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२५’ हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेने बाजी मारत सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार जिंकला. यंदा या सोहळ्यात कोण सर्वोत्कृष्ट ठरलंय? जाणून घेऊयात…
यंदा मार्च महिन्यात ‘स्टार प्रवाह’चा पुरस्कार सोहळा पार पडला होता. यावेळी ‘ठरलं तर मग’ मालिका ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरली होती. याशिवाय या मालिकेला गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक टीआरपी मिळत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, ‘सांस्कृतिक कलादर्पण’ पुरस्कार सोहळ्यात सायलीच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने नव्हे तर, जानकीच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने बाजी मारली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२५’ मध्ये विजेत्या ठरलेल्या कलाकारांसाठी अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ने ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२५’ मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार जिंकला. तर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राहुल लिंगायत (घरोघरी मातीच्या चुली) ठरले आहेत.
‘सर्वश्रेष्ठ कलागौरव’ म्हणून ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये सुमित्रा रणदिवेंची भूमिका साकारणाऱ्या सविता प्रभुणेंचा सन्मान करण्यात आला. तर, ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ या पुरस्कारावर ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार ( नानासाहेब रणदिवे – घरोघरी मातीच्या चुली ) यांनी आपलं नाव कोरलं आहे.
यंदा ‘सांस्कृतिक कलादर्पण’ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जानकीची भूमिका साकारणारी रेश्मा शिंदे ठरली आहे. तर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कल्पना सुभेदारांची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता दिघे यांना प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातून विजेत्या कलाकारांचं कौतुक करण्यात येत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायली हे मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीने खास पोस्ट शेअर करत प्राजक्ता दिघे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेत त्या सायलीच्या सासूबाईंची भूमिका साकारतात.