‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले नुकताच संपन्न झाला.अखेरीस शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत होती. अखेर यात पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. विजेतेपद स्टॅनला मिळालं असलं तरीही सगळीकडे चर्चा शिव ठाकरेची होत आहे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर आता तो पुढे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरे पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. या घरातील त्याच्या वागणुकीचं त्याच्या खेळाचं सर्वांनी कौतुक केलं. त्यामुळे बिग बॉस १६ ची ट्रॉफी शिवने जिंकावी अशी सर्वांची इच्छा होती. पण तसं झालं नाही. बिग बॉस १६ ची ट्रॉफी जरी त्याला मिळाली नसली तरीही त्याच्या वाट्याला सलमान खानचा एक मोठा चित्रपट आला असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. तर आता हिंदी चित्रपटाबरोबरच तो मराठी चित्रपटात काम करणार का यावर त्याने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?

शिवने नुकतीच ‘ई टाइम्स’ला एक मुलाखत दिली. यावेळी त्याला “मराठी चित्रपटात पदार्पण कधी करणार?” असं विचारल्यावर तो म्हणाला, “मी स्वतःला मोठ्या पडद्यावर बघण्याची स्वप्नं पाहिली आहेत. मला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आधी स्वतःला त्यासाठी पात्र बनवलं पाहिजे. त्यासाठी मला अजून खूप मेहनत करायची आहे. हे स्वप्न मोठं आहे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मला करावा प्रवासही खूप छान असणार आहे. मी जे काही काम करतो त्यात मी माझं सर्वोत्तम देतो. त्यामुळे लवकरच मी माझं हे स्वप्नही पूर्ण करेन याची मला खात्री आहे.”

हेही वाचा : राणादा बनवणार लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे खास, म्हणाला, “आज मी अक्षयाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शिव ठाकरे लवकरच सलमान खानच्या चित्रपटात झळकणार आहे असं समोर आलं होतं. आगामी काळात सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या दोन पैकीच एका चित्रपटात शिवही झळकेल असं बोललं जात आहे. त्या चित्रपटात शिवची महत्वपूर्ण भूमिका असेल. यापैकी नक्की तो कोणत्या चित्रपटात दिसणार आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.