Shweta Tiwari’s Ex-Husband Raja Chaudhary : श्वेता तिवारी ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यासह खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने १० वर्षांपूर्वी तिचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरीसह घटस्फोट घेतला होता. त्याकाळी अभिनेत्री तिच्या घटस्फोटामुळे बराच काळ चर्चेत होती. श्वेताला राजा चौधरीपासून एक मुलगीसुद्धा (पलक तिवारी) आहे.
घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर आता अभिनेत्रीचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरीने त्याची बाजू मांडत दावा केला की, श्वेताने त्याला जाणूनबुजून त्याच्या मुलीपासून दूर ठेवलं आणि तिला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटू दिले नाही. राजा चौधरीने ‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला मद्यपानाचे व्यसन असल्याचं सांगत गेल्या दोन वर्षांपासून त्याने दारू सोडल्याचं म्हटलं आहे.
राजा चौधरी श्वेता व त्याच्या नात्याबद्दल म्हणाला, “आमच्यामधील वाद सोडवणं तर दूरची गोष्ट, पण त्यासाठी महत्त्वाचा असणार संवादही होत नाही. याउलट तिने माझ्या मुलीला माझ्यापासून लांब ठेवलं. तुम्ही एखाद्या नात्यात आनंदी नसाल तर त्यातून बाहेर येणं हा तुमचा निर्णय आहे, पण यामुळे तुम्ही एक वडील आणि त्याच्या मुलीमध्ये अंतर निर्माण करणं चुकीचं आहे.”
श्वेता तिवारीचा पूर्वाश्रमीचा पती पुढे म्हणाला, “घटस्फोटामुळे माझे सर्व पैसे संपले होते. माझ्यासाठी हा अनुभव खूप वाईट होता. तिने माझ्याकडून सर्व काही घेतलं. तिने माझं नाव खराब केलं. मला माझ्या मुलीला भेटू दिलं नाही. तिने घटस्फोट घेताना मुलीला भेटायचं नाही अशी अट ठेवली होती. मी माझ्या मुलीला कधीच भेटलो नाही. तिने फक्त मलाच नाही तिच्या आजी आजोबांनासुद्धा कधी त्यांच्या नातीला भेटू दिलं नाही. तिने माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला.”
राजा पुढे म्हणाला, या सगळ्यानंतरसुद्धा तो कधी कधी पलकबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत असतो. तो म्हणाला, “मी तिला नेहमी माझ्या आयुष्यातील घडामोडी सांगत असतो. ती तिच्या करिअरमध्ये व्यग्र आहे, त्यामुळे तिला फार क्वचित माझ्याशी बोलण्यासाठी वेळ मिळतो.” पलकच्या भविष्याबद्दल राजा पुढे म्हणाला, श्वेता व तो एकत्र राहत असताना आणि पलक लहान होती तेव्हाच त्याने त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षणाचं संपूर्ण प्लॅनिंग केलं होतं. तो म्हणाला, “श्वेता सुशिक्षित नाहीये, तिला यातलं काहीच कळत नाही. मुलांनी कसं शिक्षण घ्यावं हे सुद्धा तिला माहीत नाही.”