Star Pravah : छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांत नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच समृद्धी केळकरच्या नव्या मालिकेची घोषणा केली. या सिरियलचं नाव आहे ‘हळद रुसली कुंकू हसलं’. ही ‘स्टार प्रवाह’ मालिका वाहिनीवर दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाणार आहे.
समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका ७ जुलैपासून दुपारी १ वाजता प्रसारित केली जाईल. याच वेळेला सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते. त्यामुळेच समृद्धीची नवीन मालिका सुरू झाल्यावर ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेमधून अभिनेत्री तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. पहिल्या दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम टॉप-५ मध्ये असायची. याशिवाय ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा ऑनलाइन टीआरपी सुद्धा चांगला होता.
मात्र, जानेवारी २०२५ मध्ये तेजश्री प्रधानने अचानक ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट घेतली. तिच्या एक्झिटनंतर अभिनेत्रीच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता. याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, याशिवाय प्रेक्षकही कमेंट्स सेक्शनमध्ये नाराजी व्यक्त करत होते. याचा फटका ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या टीआरपीला बसला.
आता जवळपास २ वर्षांनी ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे. तेजश्री प्रधानने एक्झिट घेतल्यावर मुक्ता कोळीच्या प्रमुख भूमिकेसाठी सीरियलमध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळेची वर्णी लागली होती. याशिवाय राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर या कलाकारांनी देखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
दरम्यान, समृद्धीची मालिका ७ जुलैपासून सुरू होणार असल्याने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा शेवटचा भाग ५ किंवा ६ जुलैला प्रसारित होण्याची दाट शक्यता आहे. आता ‘प्रेमाची गोष्ट’चा शेवट कसा होईल याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.