Tejashri Pradhan Birthday Post : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखलं जातं. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तेजश्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतल्यापासून तिचे चाहते ती नव्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर याबद्दल अभिनेत्रीने वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टमध्ये हिंट दिली आहे.
तेजश्री प्रधान लिहिते, “प्रिय माझी माणसं… माणसांची श्रीमंती आपल्या आयुष्यात येणं फार गरजेचं असतं आणि सरत्या प्रत्येक वर्षाबरोबर मी अधिकाधिक श्रीमंत होतेय याची ग्वाही तुमच्या शुभेच्छांमधून करून दिलीत यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार… तुमच्या प्रेमाने, मोठ्यांच्या आशीर्वादांनी माझा कालचा वाढदिवस खूपच छान, मनासारखा पार पडला त्यासाठी सुद्धा खूप Thank You, अगदी मनापासून…”
“बाकी काय! सरलं ते सरलं… राहीलं ते राहीलं… आयुष्यात चढउतार येत राहतात. अनेक गोष्टी शिकायला मिळतात… आनंदी आयुष्य, अचिव्हमेंट, आयुष्यातील शांतता या गोष्टीही महत्त्वाच्या असतात आणि बाकी हळुहळू, शिकत-शिकत Betterment कडे वाटचाल चालूच राहिल. तुम्ही सगळे असेच कायम माझ्याबरोबर राहा, कारण “तू हैं तो गम ना आते हैं, तू हैं तो मुस्कुराते हैं” अशी पोस्ट तेजश्रीने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
तसेच या पोस्टमध्ये सर्वात शेवटी अभिनेत्रीने तळटीप म्हणून, “लवकरच तुमच्या भेटीला येतेय… काहीतरी आणखी छान घेऊन…” ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना दिली आहे. आता तेजश्री नेमकी कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याचा उलगडा अद्याप तिने केलेला नाही.
आता अभिनेत्री येत्या काळात मालिका, चित्रपट, नाटक की अन्य कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, तिचे चाहते ही पोस्ट वाचून प्रचंड आनंदी झाले आहेत आणि अभिनेत्रीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाटत पाहत आहेत.
दरम्यान, तेजश्रीने तिचा वाढदिवस यावर्षी अशोक व निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे आणि अभिनेत्री शिवानी बावकरबरोबर साजरा केला. शिवानीने तेजश्रीसाठी खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.