Vivek Oberoi talks about his initial days as an entrepreneur : बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या चित्रपटांमध्ये फारसा दिसत नाही. त्याने अभिनयाच्या दुनियेपासून स्वतःला दूर केले आहे आणि व्यवसायाला त्याच्या आयुष्याचे मुख्य केंद्र बनवले आहे.
२० वर्षांहून अधिक काळ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तो आता उद्योजकतेत वेगाने पुढे जात आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, त्याने गेल्या एका वर्षात त्याच्या १२ कंपन्यांसाठी सुमारे ८,५०० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. त्यापैकी दोन कंपन्या लवकरच आयपीओ आणणार आहेत. विवेकने असेही म्हटले की, तो चित्रपटांवर अवलंबून राहू इच्छित नाही.
सीएनबीसी टीव्ही-१८ ला दिलेल्या मुलाखतीत विवेकने सांगितले की, त्याचे मन लहानपणापासूनच व्यवसायात होते. त्याचे वडील अभिनेते सुरेश ओबेरॉय यांना पाहून तो खूप काही शिकू शकला. विवेक म्हणाला, “बाबा नेहमीच गुंतवणूकदार राहिले आहेत. ते जमीन खरेदी-विक्री करायचे आणि चांगले पैसे कमवत असत. माझी पहिली समज ‘जमीन’पासून सुरू झाली. मी ९-१० वर्षांचा असताना ते अचानक काही वस्तू आणायचे, कधी परफ्यूम, कधी इलेक्ट्रॉनिक्स. मी ते बॅगेत भरून घरोघरी विकायचो. दिवसाच्या शेवटी ते मला हिशोब विचारायचे आणि म्हणायचे की नफा ठेव; पण झालेला खर्च परत कर.”
विवेक चित्रपट उद्योगाबद्दल काय म्हणाला?
विवेक म्हणतो, “काही वर्षे काम केल्यानंतर मला असे वाटले की, मी जिथून सुरुवात केली होती, त्याच ठिकाणी परत फिरत आहे. मला हे आवडत नव्हते. हा अनुभव मला अधिक मजबूत बनवत नव्हता. मला काही लोकांबरोबर काम करायला आवडले; पण खरे सहकार्य तेव्हा मिळते जेव्हा दुसरी व्यक्ती प्रतिभेला संधी देते, सल्ला देते किंवा तिला पाठिंबा देते. या सर्व गोष्टींची इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता होती. एक तर मी नकारात्मक विचारसरणीच्या दलदलीत पडलो असतो किंवा त्याच दारावर डोके आपटणे थांबवून एक नवीन दार उघडले असते आणि मी तेच केले.”
विवेक म्हणाला की, त्याला भरपूर पैसे गुंतवण्यात काहीच अडचण नाही. त्याच्या सर्व कंपन्यांनी गेल्या वर्षी मिळून एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. एक अब्ज डॉलर्स ही भारतीय चलनातील ८,५०० कोटी रुपये इतकी किंमत आहे. अभिनेता म्हणाला, “ही काही छोटी रक्कम नाही; पण खरी गोष्ट म्हणजे ते पैसे योग्य दिशेने कसे गुंतवायचे आणि वाढ कशी सुरक्षित ठेवायची. कुठे तरी सिलिकॉन व्हॅलीची विचारसरणी आणि मारवाडी मानसिकता एकत्र करणे आवश्यक आहे.”