बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन यांनी एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. पहिल्यांदाच ‘जोश’ या चित्रपटात बहिण-भावाची भूमिका साकारणा-या या जोडीने ‘देवदास’मधील त्यांच्या प्रेमकथेतून अनेकांची मने जिंकली होती. त्यांच्या केमस्ट्रीने सर्वांना भुरळ पाडलेली. आता पुन्हा एकदा ही जोडी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाद्वारे त्यांच्यातील अफलातून केमिस्ट्री दाखविण्यास सज्ज झाली आहे. जवळपास १४ वर्षांनंतर ऐश्वर्या आणि शाहरुख रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. पण, ‘देवदास’सारखा हिट चित्रपट दिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही जोडी इतकी वर्ष एकत्र का नाही दिसली, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. यामागचे कारण खुद्द ऐश्वर्यानेच सिमी गरेवाल यांच्या कार्यक्रमात सांगितले होते.
सिमी गरेवाल यांच्या कार्यक्रमात ऐश्वर्याने धक्कादायक गोष्टींचा सांगितले होते. ‘देवदास’ चित्रपटानंतर ऐश्वर्या आणि शाहरुखला पाच चित्रपटांसाठी करारबद्ध करण्यात आले होते. पण, त्यातील एकाही चित्रपटात ही जोडी एकत्र झळकली नाही. त्याबाबत विचारले असता ऐश्वर्या म्हणाली की, एकेकाळी आम्ही दोघंजण एकत्र काही चित्रपटांमध्ये करणार असल्याचे बोललं जात होतं. मात्र, अचानक काहीही स्पष्टीकरण न देता त्या चित्रपटांबद्दलची चर्चा बंद झाली. मला याबाबतचं उत्तर कधीच मिळालं नाही. त्यावेळी ‘चलते चलते’, ‘वीर झारा’, ‘कल हो ना हो’ आणि काही चित्रपटांमध्ये हे दोन्ही कलाकार एकत्र काम करणार असल्याची चर्चा होती. अचानक चित्रपटांतून काढून टाकल्यावर किंवा आपली जागा दुस-या अभिनेत्रीला दिल्यावर तुझी काय भावना होती? असा प्रश्न करण्यात आला असता ऐश्वर्या म्हणाली की, हे सर्वच माझ्यासाठी धक्कादायक आणि दुखावणार होतं. यासर्व प्रकरणाबाबत तू शाहरुखशी का नाही बोललीस, असा प्रश्न केला असता ती म्हणाली की, जर त्या लोकांना स्पष्टीकरण देण्याची इच्छा असती तर त्यांनी तसं केलं असतं. पण बहुदा त्यांचा तसा काही हेतू नव्हताचं. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही की इतरांना जाऊन त्याचा जाब विचारेन. माझ्यासाठी माझी प्रतिष्ठा फार महत्त्वाची आहे.
असो, आता हा सर्व भूतकाळ झाला आहे. पण त्यांच्या चाहत्यांची या दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होईल. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये हे दोघे एकत्र दिसतील. शाहरुख या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार असून रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या २८ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2016 रोजी प्रकाशित
शाहरुखच्या चित्रपटांतून ऐश्वर्याची गच्छंती होते तेव्हा..
'देवदास' चित्रपटानंतर ऐश्वर्या आणि शाहरुखला पाच चित्रपटांसाठी करारबद्ध करण्यात आले होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 10-10-2016 at 12:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai bachchan was dropped from shah rukh khans films