अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मस्ती’, ‘धमाल’, हाऊसफुल्लसारखे विनोदी चित्रपट केले. त्याचे विनोदचे टायमिंग अचूक आहे. एक व्हिलनसारख्या चित्रपटातून त्याने नकारात्मक भूमिकादेखील तितक्याच ताकदीने साकारली. अभिनेत्री जिनिलिया देशमुख बरोबर त्याने २०१२ साली लग्न केले. दोघे सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. लग्न करण्याआधी ते दोघे एकमेकांना १० वर्ष डेट करत होते. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल शाहरुख खानने एक दिवस रितेश देशमुखला फोन करून सांगितलं होत मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. अर्थात हे मस्करीत म्हणाला तो, यामागे नेमका किस्सा काय घडला आहे ते जाणून घेऊयात.

‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी येत असतात. मुंबई शहरातले त्यांचे अनुभव सांगत असतात. एका भागात रितेश जिनिलिया हे दोघे आले होते. मुंबईबद्दल ते दोघे आपापल्या आठवणी सांगत होते. दोघे एकमेकांना कसे लपून छपून भेटायचे, पहिल्या चित्रपटाबद्दलचे किस्से त्यांनी सांगितले. पुढे रितेश असं म्हणाला की ‘ही खूप जुनी गोष्ट आहे जेव्हा आयफोन नुकतेच भारतात लाँच करण्यात आले होते. माझ्याकडे तेव्हा दोन आयफोन होते तेव्हा आयफोन लॉक असायचे. मला माहित होत शाहरुख खानला नवनवीन तंत्रज्ञानाची खूप आवड होती. म्हणून त्यातील एक फोन मी शाहरुखच्या घरी पाठवला तेव्हा मुंबईत फक्त दोनच आयफोन होते जे माझ्याकडे होते’. शाहरुखने रात्री ११ वाजता मला फोन केला आणि म्हणाला ‘रितेश काय करतोस? हे तू काय पाठवले आहेस’? त्यावर मी म्हणालो ‘हे माझ्याकडून तुझ्यासाठी भेट आहे’. त्यावर शाहरुखने उत्तर दिले ‘मला एकच सांगायच आहे ,मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे’. हा किस्सा सांगताच कार्यक्रमाचा निवेदक, जिनिलिया दोघे हसायला लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश शाहरुख जरी एकत्र चित्रपटातकाम केले नसले तरी या किस्स्यांवरून दोघे चांगले मित्र आहेत हे जाणवते. रितेशचे सलमान खानशी उत्तम संबंध आहेत. रितेशच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटात सलमान खानने काम केले होते. अक्षय कुमारबरोबर रितेशची चांगली मैत्री आहे. रितेश देशमुखचा आगामी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात तमन्ना भाटिया दिसणार आहे. दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.